मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी घेतली रुग्णालयात भेट; महापालिकेकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही
मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प परिसरात झालेल्या दुर्घटनेतील जखमींची पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या दुर्घटनेतील जखमी नागरिकांची महापौर रवि लांडगे यांनी शुक्रवारी मेडिकव्हर हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी महापौरांनी जखमी नागरिकांसह त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. या कठीण प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बाधित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभी असून, आवश्यक ती सर्व मदत प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भेटीदरम्यान साईनाथ हॉस्पिटलचे प्रमुख तथा नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्येक जखमीच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेण्यात आली.
महापौरांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना जखमींना सर्वोत्तम दर्जाचे आणि तातडीचे वैद्यकीय उपचार मिळावेत, उपचारासाठी आवश्यक असलेला सर्व शासकीय समन्वय तात्काळ पूर्ण करण्यात यावा तसेच प्रत्येक बाधित कुटुंबाला आवश्यक ती मदत वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, "ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून प्रत्येक बाधित कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नागरिकांचे प्राण आणि सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही अडचण येऊ नये आणि आवश्यक त्या प्रत्येक स्तरावर महापालिका त्यांच्या सोबत राहील. या संकटाच्या काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्येक बाधित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे."
दुर्घटनेतील सर्व जखमी नागरिकांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थनाही महापौरांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या बचावकार्य, वैद्यकीय उपचार, प्रशासकीय समन्वय आणि बाधित नागरिकांना आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य प्राधान्याने सुरू असून, संपूर्ण यंत्रणा नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0