सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा – खासदार श्रीरंग बारणे

पवना आणि इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी पीएमआरडीए प्रशासनाला दिले. मावळ मतदारसंघातील विविध विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला.

May 7, 2026 - 22:20
 0  2
सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा – खासदार श्रीरंग बारणे
श्रीरंग बारणे, पीएमआरडीए, पवना नदी, इंद्रायणी नदी,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पवना आणि इंद्रायणी नदीपात्रात थेट सांडपाणी सोडणाऱ्या सोसायट्यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशा स्पष्ट सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी पीएमआरडीए प्रशासनाला दिल्या. पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पीएमआरडीए हद्दीतील मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा खासदार बारणे यांनी गुरुवारी घेतला. यावेळी पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस दक्षता अधिकारी अमोल झेंडे, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोलंबे, सह आयुक्त रुपाली आवले डंबे, पुनम मेहता, हिम्मत खराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, रिनाज पठाण, उपसंचालक स्मिता कलकुटकी, संचालक अविनाश पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी पीएमआरडीएकडून नदीलगत परवानगी दिलेल्या सोसायट्यांची पाहणी करून त्यांचे एसटीपी प्रकल्प कार्यरत आहेत की नाहीत, याची तपासणी करण्याचे निर्देश दिले. थेट नदीत सांडपाणी सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही याची माहिती देण्यास सांगितले.

मावळ तालुक्यातील पर्यटन विकासाबाबतही त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. लोहगड ते विसापूर रस्ता विकसित करणे, लोहगड पायथ्याशी शिवसृष्टी उभारणे, भाजे लेणी ते लोहगड रस्त्यावर सुरक्षा कठडे बसविणे, तसेच कारला फाटा ते मळवली रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

देहू ते येलवाडी मार्गावरील खराब रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याचे आदेशही त्यांनी दिले. देहू आणि भंडारा डोंगर परिसरात मोठ्या संख्येने वारकरी येत असल्याने या मार्गांची दुरवस्था दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

लक्ष्मी चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना

भूमकर चौक ते लक्ष्मी चौक मार्गावर वाढत्या वाहतूक कोंडीबाबतही खासदार बारणे यांनी चिंता व्यक्त केली. लक्ष्मी चौक-मरुंजी रोड परिसरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून चौक कोंडीमुक्त करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

पवना नदीवरील पुलाचे काम गतीने पूर्ण करण्याचे आदेश

किवळे ते सांगवडे दरम्यान पवना नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला. महापालिका हद्दीतील काम पूर्ण झाले असले तरी सांगवडे परिसरात जागा ताब्यात नसल्यामुळे काम रखडल्याचे निदर्शनास आले. संबंधित जागा तातडीने ताब्यात घेऊन पुलाचे काम मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तसेच, तत्कालीन नवनगर विकास प्राधिकरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार तत्काळ सव्वा सहा टक्के परतावा देण्याचे आदेश देण्यात आले. कागदपत्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.