मावळातील विकासकामांना गती द्या, पावसाळापूर्वी सर्व कामे पूर्ण करा : खासदार श्रीरंग बारणे

मावळ तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. पावसाळापूर्वीची कामे पूर्ण करणे, शेतकऱ्यांना खते-बी-बियाणे उपलब्ध करून देणे, निकृष्ट दर्जाच्या कामांवर कारवाई करणे आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Jun 21, 2026 - 19:13
 0  2
मावळातील विकासकामांना गती द्या, पावसाळापूर्वी सर्व कामे पूर्ण करा : खासदार श्रीरंग बारणे
श्रीरंग बारणे, मावळ विकासकामे, मावळ आढावा बैठक,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

मावळ, दि. 19 : मावळ विधानसभा मतदारसंघात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या सर्व कामांना गती देऊन वेळेत पूर्ण करावे, कामांचा दर्जा राखावा तसेच पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या.

मावळ तालुक्याची आढावा बैठक शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयात खासदार बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार सुनील शेळके, तहसीलदार विक्रम देशमुख, पंचायत समिती सभापती सुनिताताई येवले, उपसभापती साहेबराव कारके, शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत शिक्षण, अंगणवाडी, कृषी, आरोग्य, जलजीवन मिशन, घरकुल योजना आणि विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा राखून ती मुदतीत पूर्ण करावीत. घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पीएमआरडीए आणि वन विभागाकडून ना-हरकत दाखले मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी नागरिकांना तत्काळ दाखले उपलब्ध करून द्यावेत.

रस्ते आणि इतर विकासकामांच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी येत असल्याचे नमूद करत त्यांनी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासकीय आरोग्य यंत्रणेकडून दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच रुग्णांशी संवेदनशीलतेने संवाद साधण्याचे निर्देशही दिले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे शंभर टक्के पूर्ण करावीत. पाणी साचणाऱ्या ठिकाणी विशेष उपाययोजना करून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना वेळेत खते व बी-बियाणे उपलब्ध करून देण्याबरोबरच हवामान आणि पावसाबाबत नियमित माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्रकरणात 13 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत खासदार बारणे यांनी मावळ तालुक्यात कोणतेही अवैध धंदे सुरू राहता कामा नयेत, असे स्पष्ट केले. अवैध दारू, ड्रग्ज आणि अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात धडक कारवाया कराव्यात तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0