स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा : मुकेश सोनू सरवान

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सरवान यांनी मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेला योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

May 29, 2026 - 20:10
 0  1
स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा : मुकेश सोनू सरवान
मुकेश सोनू सरवान, स्वच्छता कर्मचारी योजना, बृहन्मुंबई महानगरपालिका

मुंबई | प्रतिनिधी 

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रभावी अंमलबजावणी करून पात्र कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग (मुंबई) चे माननीय उपाध्यक्ष श्री. मुकेश सोनू सरवान यांनी दिले.

मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी श्री. सरवान यांनी शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची भेट घेत विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली.

बैठकीनंतर श्री. सरवान यांनी कुलाबा परिसरातील राजवाडकर मार्ग, पंचशील नगर येथे आश्रय योजना अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीची प्रत्यक्ष पाहणीही केली.

बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त किशोर गांधी, उपायुक्त किरण दिघावकर, उपायुक्त शशांक भोरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, सामाजिक न्याय विभाग व नगरविकास विभागाच्या शासन निर्णयांनुसार राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत २५ वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पात्रतेच्या निकषांनुसार मालकी तत्त्वावर मोफत सदनिका उपलब्ध करून देण्याबाबतची सद्यस्थितीही यावेळी तपासण्यात आली.

तसेच दूषित गटारांमध्ये काम करताना मृत्यू झालेल्या किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या हाताने मैला वाहून नेणाऱ्या (मॅन्युअल स्कॅव्हेंजर) व स्वच्छता कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील माहिती देखील श्री. सरवान यांनी जाणून घेतली.

याशिवाय वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांची माहिती, स्वच्छता कर्मचाऱ्यांची मंजूर व रिक्त पदे, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.