मुंबईतील झाडांचे वैज्ञानिक सर्वेक्षण व आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा; वृक्षसंवर्धनासाठी महापालिकेचा मोठा निर्णय
मुंबईतील झाडांचे वैज्ञानिक वर्गीकरण, सर्वंकष सर्वेक्षण आणि आरोग्य अभ्यासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तज्ज्ञांच्या सहकार्याने कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. झाडे पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण, डेटाबेस तयार करणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि नवीन वृक्षलागवडीवर भर देण्यात येणार आहे.
मुंबई प्रतिनिधी देवानंद शिंदे
मुंबई, दि. १७ : मुंबईतील वृक्षसंपदेचे संवर्धन, झाडांचे वैज्ञानिक वर्गीकरण आणि आरोग्य अभ्यास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्वंकष कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वृक्षतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करण्यात आली. झाडे पडून होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण, डेटाबेस तयार करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शहरातील झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक आणि सुदृढ अशा तीन श्रेणींमध्ये वैज्ञानिक वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक आणि वृक्षतज्ज्ञ यांच्या सहभागातून सर्वंकष सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.
बैठकीत झाडांचे वय, प्रजाती, आरोग्य, संरचनात्मक स्थिती, आयुर्मान आणि इतर परिस्थितीजन्य माहितीचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार करण्यावरही भर देण्यात आला. तसेच वृक्षसंवर्धन, योग्य छाटणी, झाडांची निगा आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती पुस्तिका तयार करून ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, २२ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत अतिवेगवान वाऱ्यांमुळे मुंबईत ८३० झाडे पडली, त्यापैकी ४८० झाडे खासगी जागांवरील होती. याच काळात १,२३८ झाडांच्या फांद्या पडल्या, त्यापैकी ७०९ फांद्या खासगी क्षेत्रातील झाडांच्या होत्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या आरोग्याचा वैज्ञानिक अभ्यास करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
बैठकीत विविध विकासकामांमुळे तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे शक्यतो मुंबईतच लावण्यावर, योग्य प्रजातींची निवड, मुळांच्या वाढीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे आणि रस्ते, पर्जन्य जलवाहिनी, मलनिस्सारण व उद्यान विभागांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.
झाडांच्या फांद्यांच्या छाटणीसाठी शास्त्रशुद्ध मानक कार्यपद्धती (SOP) तयार करणे, आधुनिक उपकरणांचा वापर, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देणे आणि खासगी क्षेत्रातील झाडांच्या छाटणीसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबतही चर्चा झाली.
तज्ज्ञांनी झाडांच्या मुळांवर होणारा परिणाम, मातीची उपलब्धता, पाण्याचा निचरा, हवामान बदलाचा प्रभाव आणि झाडे पडण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र संशोधनाची आवश्यकता व्यक्त केली. तसेच शहरात 'बायोडायव्हर्सिटी झोन' विकसित करणे, स्थानिक प्रजातींची वृक्षलागवड वाढविणे आणि योग्य ठिकाणी बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.
यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी वृक्षसंवर्धनासाठी केवळ महानगरपालिका नव्हे तर नागरिकांचा सहभाग, जनजागृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. बैठकीत मांडलेल्या सर्व सूचनांचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून, मुंबईतील वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक कृती आराखडा लवकरच तयार केला जाणार आहे.
याशिवाय, महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झाडांचे संगोपन, मुळांच्या संरचनेचा अभ्यास आणि आधुनिक वृक्ष व्यवस्थापनाबाबत अद्ययावत प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत लवकरच ठोस कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0