मविप्र रुग्णालयात आता विनामूल्य किडनी व लिव्हर प्रत्यारोपण; उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मोठा दिलासा
नाशिकच्या आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या सुविधा उपलब्ध होणार असून उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नाशिक ब्युरो
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये आता किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत या महागड्या शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य केल्या जाणार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी या नव्या सुविधांची माहिती दिली. यावेळी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक मंडळाचे सदस्य तसेच रुग्णालय प्रशासन उपस्थित होते.
ॲड. ठाकरे यांनी सांगितले की, मविप्र रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला असून अत्याधुनिक डायलिसिस युनिट, तज्ज्ञ नेफ्रॉलॉजिस्ट, प्रत्यारोपण तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचारी सेवा देत आहेत. आतापर्यंत आईने मुलाला, वडिलांनी मुलाला तसेच आजीने नातवाला किडनी दान केल्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या एका यशस्वी शस्त्रक्रियेत आईने आपल्या मुलाला किडनी दान करून त्याला नवजीवन दिले. रोशन बच्छाव या तरुणाची किडनी केवळ १० टक्के कार्यरत असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याची आई मनिषा बच्छाव यांनी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. मविप्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, आगामी दोन ते तीन महिन्यांत आणखी ५ ते ७ प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शासनाची परवानगी मिळाल्यानंतर लवकरच लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहेत.
याशिवाय रुग्णालयात स्पोर्ट्स फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी विभागही सुरू करण्याची तयारी सुरू आहे. तसेच सिडको परिसरातील नागरिकांसाठी उत्तमनगर येथे नवीन बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला असून येथे माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
दरम्यान, मविप्र रुग्णालयाने अवयवदान जनजागृतीसाठीही विशेष उपक्रम सुरू केले आहेत. सटाणा तालुक्यातील एका १४ वर्षीय मेंदूमृत मुलाच्या अवयवदानामुळे अनेकांना जीवनदान मिळाल्याची प्रेरणादायी घटनाही यावेळी समोर आली.
शैक्षणिक क्षेत्रातही मोठे पाऊल टाकत महाविद्यालयाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा १२० वरून १५० करण्यात आल्या असून पुढे २५० जागांसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0