पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ अंतर्गत ३ लाखांपर्यंत कर्ज

राज्यातील पशुपालकांना ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून ३ लाखांपर्यंत कर्ज व व्याज सवलतीचा लाभ मिळणार असून १० लाख लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

Apr 18, 2026 - 20:46
 0  4
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ अंतर्गत ३ लाखांपर्यंत कर्ज
पशुसंवर्धन योजना, किसान क्रेडिट कार्ड, KCC scheme

कोल्हापूर/पुणे, दि. १८ : राज्यातील पशुपालकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ (KCC) योजना वेगाने राबविण्यात येत आहे. पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून मोठा फायदा होणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १.६० लाख रुपयांपर्यंत कर्ज विनातारण मिळणार असून, दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढवता येणार आहे. तसेच विद्यमान KCC धारकांनाही पतमर्यादा वाढवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी नियमित परतफेड करणाऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून एकूण ७ टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळते. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये शून्य टक्के व्याजदराचा लाभही मिळू शकतो.

सन २०२६-२७ पासून ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अंतर्गतही या कार्डद्वारे खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे. राज्यातील १० लाख पशुपालकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या योजनेसाठी काही अटी लागू आहेत. लाभार्थ्यांनी इतर कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच सर्व पशुधनाची नोंदणी एनडीएलएम (भारत पशुधन) पोर्टलवर असणे बंधनकारक आहे.

पशुपालकांनी घेतलेले कर्ज एका वर्षाच्या आत परत करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी, दूध संस्थेशी किंवा १९६२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1