आषाढी वारीपूर्वी देहू ते पालखी मार्गाची पोलिस आयुक्तांकडून पाहणी; सुरक्षित आणि निर्विघ्न सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी आणि पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी देहू मंदिर परिसरासह संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी केली. गर्दी नियोजन, सुरक्षा, बॅरिकेडिंग, मेट्रो कामांमुळे निर्माण झालेले अडथळे दूर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

Jul 2, 2026 - 05:22
 0  2
आषाढी वारीपूर्वी देहू ते पालखी मार्गाची पोलिस आयुक्तांकडून पाहणी; सुरक्षित आणि निर्विघ्न सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
आषाढी वारी 2026, संत तुकाराम महाराज पालखी, देहू, विनय कुमार चौबे,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी | दि. १ जुलै २०२६ : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी-२०२६ आणि पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी देहू येथील मंदिर परिसरासह संपूर्ण पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. वारकऱ्यांचा सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

७ जुलै २०२६ रोजी नियोजित पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तांनी श्री क्षेत्र देहू येथील मुख्य मंदिर, परिसर आणि पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्थान कार्यालयाला भेट देऊन अध्यक्ष जालिंदर विश्वनाथ मोरे महाराज, विश्वस्त गणेश उत्तम मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या बैठकीत पालखी सोहळ्यादरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी, गर्दी व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यात आली. पोलिस आयुक्तांनी सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून भक्तिमय वातावरणात सोहळा यशस्वीरीत्या पार पाडला जाईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या पालखी रथाचीही पाहणी करण्यात आली. मंदिर परिसरातील दर्शनबारीत होणाऱ्या गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यासाठी योग्य प्रकारे बॅरिकेडिंग आणि दोरखंडांचा वापर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

त्यानंतर अनगडशहा बाबा दर्गा, चिंचोली गावातील श्री शनिमंदिर तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली. निगडी येथील भक्ती-शक्ती चौक ते मोरवाडी चौकादरम्यान सुरू असलेल्या पुणे मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना बॅरिकेडिंग आत सरकविणे, राडारोडा हटविणे, रस्ता समतल करणे आणि आवश्यक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही पालखी मार्ग रुंद करण्यासाठी रस्त्याच्या कडेला साचलेला मलबा हटविणे, अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे तसेच मार्गातील कमानी हटविण्याचे निर्देश देण्यात आले.

या पाहणीवेळी पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड आणि बसवराज तेली, विविध विभागांचे पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त प्रदीप ठेंगल तसेच पुणे मेट्रोचे निवासी अभियंता यतेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

पोलिस प्रशासनाने यंदाची आषाढी वारी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0