पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची मे महिन्यात धडक कारवाई; 62,727 वाहनचालकांवर कारवाई, 6.76 कोटींचा दंड
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने मे 2026 महिन्यात विशेष मोहीम राबवत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 62,727 वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 6 कोटी 76 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून सिग्नल जंपिंग, ट्रिपल सीट, नो-पार्किंग, मोबाईलवर बोलणे आणि इतर वाहतूक नियमभंगाविरोधात कठोर पावले उचलण्यात आली.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. 2 जून 2026: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने मे 2026 या एका महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोठी कारवाई केली. या कालावधीत तब्बल 62 हजार 727 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून 6 कोटी 76 लाख 30 हजार 900 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक, आयटी आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि वाहनांशी संबंधित गुन्ह्यांमध्येही वाढ होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशीकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 1 मे ते 31 मे 2026 दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत नंबर प्लेट नियमभंगाच्या 5,475, धोकादायक वाहनचालकांच्या 284, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या 1,993, सिग्नल जंपिंगच्या 8,483, ट्रिपल सीटच्या 6,539 आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 402 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
याशिवाय जड-अवजड वाहनांवर 8,142, काळी काच असलेल्या वाहनांवर 3,090, मॉडिफाईड सायलेंसर असलेल्या वाहनांवर 1,032, राँग साईड वाहनचालकांवर 239, बसवर 3,490, रिक्षांवर 3,102, विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांवर 870, टोईंग कारवाईत 11,580 आणि नो-पार्किंग व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 19,340 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक शाखेने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी जबाबदारीने वाहन चालविण्याचा सल्ला दिला आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0