रमाईंचा त्याग आणि समर्पणच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामागची खरी ताकद : रामदास आठवले
पिंपरी येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडले. रमाईंचा त्याग, समर्पण आणि खंबीर साथ हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्यामागची खरी ताकद असल्याचे आठवले यांनी सांगितले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी : त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर या संघर्ष, त्याग आणि समर्पणाची जिवंत प्रतिमा होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या महान कार्याला खंबीर साथ दिली. म्हणूनच पिंपरी येथे उभारण्यात येणारे माता रमाईंचे स्मारक हे केवळ वास्तू नसून स्त्रीशक्ती, त्याग आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाचे प्रेरणास्थान ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) लगतच्या मोकळ्या जागेत उभारण्यात येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे होते.
रमाईंच्या त्यागाचा गौरव
रामदास आठवले म्हणाले की, बाबासाहेबांनी देशाला विचार, संविधान आणि स्वाभिमान दिला, मात्र त्या विचारांना उभे राहण्यासाठी जी नि:स्वार्थ शक्ती आवश्यक होती ती रमाईंच्या रूपाने त्यांच्या पाठीशी होती. त्यांच्या संघर्षामुळेच बाबासाहेबांना मानवमुक्तीच्या चळवळीला बळ मिळाले.
“डॉ. बाबासाहेब नसते तर आम्हाला आज मुक्तपणे बोलण्याचाही अधिकार मिळाला नसता,” असे सांगत त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.
२७ कोटींचा प्रकल्प
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, माता रमाई सृष्टीसाठी कार्यकर्त्यांनी तब्बल १५ वर्षे सातत्याने लढा दिला. त्या संघर्षाला आज न्याय मिळाला असून महापालिकेने सुमारे २७ कोटी रुपये खर्चून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
ते म्हणाले, देशात पहिल्यांदाच त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचे इतके भव्य स्मारक साकारले जात आहे.
सामाजिक परिवर्तनाचा वारसा
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील स्मारक उपक्रमांचे कौतुक केले. पिंपरीमध्ये बाबासाहेब, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले आणि आता रमाई आंबेडकर यांची स्मारके उभारली जात असल्याने सामाजिक परिवर्तनाचा सशक्त वारसा जतन होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित
या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, उमा खापरे, शंकर जगताप, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, माजी मंत्री विजय गिरकर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद शिंदे यांच्या गीतांनी रंगला सोहळा
भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांच्या गीतगायन कार्यक्रमाने भीमसृष्टी परिसर भारावून गेला. बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करणाऱ्या प्रेरणादायी गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

