स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त भगूर येथे अभिवादनासाठी सावरकर प्रेमींची मोठी गर्दी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील जन्मस्थळी हजारो सावरकर प्रेमींनी अभिवादन केले. ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा, मल्लखांब प्रात्यक्षिके, ग्रंथ दिंडी आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
नाशिक ब्युरो
देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवनभर संघर्ष करणारे प्रखर राष्ट्रभक्त, समाजसुधारक, प्रतिभासंपन्न कवी आणि लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील त्यांच्या जन्मस्थानी मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले. सावरकर स्मारक परिसरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सावरकर प्रेमी, नागरिक, निवृत्त लष्करी अधिकारी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
भगूर येथील सावरकर जन्मस्थान अर्थात सावरकर स्मारक येथे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि प्रशासनातील मान्यवरांनी उपस्थित राहून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले. यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माजी खासदार हेमंत गोडसे, भगूरच्या नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवृत्त पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख, कारगिल वीर नायक दीपचंद, माजी नौदल सैनिक हरिश्चंद्र चौबे, जे. एस. रमेशचंद्र, सावरकर प्रतिष्ठान भगूरचे अध्यक्ष केशव कासार, कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ सावरकर प्रेमी एकनाथ शेटे, श्याम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सावरकर जयंतीनिमित्त शहरातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अभिनेते विजय पाटकर यांनीही सहभाग घेतला होता. शोभायात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याची ग्रंथ दिंडी, महिलांचे मर्दानी खेळ तसेच मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
“वंदे मातरम”, “भारत माता की जय” आणि “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो” अशा घोषणांनी सावरकर स्मारक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सावरकर जयंतीनिमित्त स्मारक परिसर आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. तसेच शहरातील विविध ठिकाणी सावरकरांना अभिवादन करणारे फलक विविध पक्ष आणि संघटनांकडून लावण्यात आले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकच्या बागेश्री वाद्यवृंदाच्या कलाकारांनी सावरकरांच्या गीतांचा संगीतमय कार्यक्रम सादर करून अभिवादन केले. तर नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सायकलपटूंनी नाशिक ते भगूर अशी सायकलवारी करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनोखे अभिवादन केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
