श्रीरंग बारणे यांची घोषणा: पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन उपकेंद्रांमुळे वीज समस्या सुटणार

पिंपरी-चिंचवड व मावळ भागातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन उपकेंद्रे आणि अतिउच्चदाब केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी यासंदर्भात माहिती देत वीजपुरवठा अधिक सक्षम होणार असल्याचे सांगितले.

May 4, 2026 - 22:21
 0  2
श्रीरंग बारणे यांची घोषणा: पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन उपकेंद्रांमुळे वीज समस्या सुटणार
श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड वीज समस्या

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील २० वर्षांचा विचार करून वीज यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पिंपरी, चिंचवड, थेरगाव, रावेत आणि देहूगाव येथे नवीन उपकेंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती श्रीरंग बारणे यांनी दिली.

महावितरणच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत खासदार बारणे यांनी सुरू असलेली, प्रलंबित आणि प्रस्तावित कामांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी प्रादेशिक संचालक सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सिंहजीराव गायकवाड, युवराज जरग, संजय नेते तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी सांगितले की, थेरगाव, चिंचवड, रावेत आणि पिंपरी येथे उपकेंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देहूगाव येथे नवीन उपकेंद्र उभारले जाणार असून ताथवडे येथे अतिउच्चदाब केंद्र मंजूर झाले आहे. तसेच रहाटणी येथेही अतिउच्चदाब केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मामुर्डी येथील उपकेंद्राचे मजबुतीकरण करण्यात येणार असून २२ केव्ही भूमिगत वाहिनी टाकण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

तळेगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अंबी येथील अतिउच्चदाब केंद्राची क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच गहुंजे येथे नवीन अतिउच्चदाब केंद्र प्रस्तावित करण्यात आले असून यामुळे विद्यमान केंद्रांवरील भार कमी होणार आहे.

खासदार बारणे म्हणाले की, वीजपुरवठा खंडित होण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन विविध विकासकामे हाती घेतली जात आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत यंदा १७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत अधिकाधिक नागरिकांनी रुफटॉप सोलरचा लाभ घ्यावा, तसेच स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करण्याचेही त्यांनी आवाहन केले.

या सर्व प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील नागरिक तसेच औद्योगिक क्षेत्राला अखंडित व सक्षम वीजपुरवठा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0