पश्चिम बंगाल बॉम्बफेक प्रकरणातील दोन आरोपी मुंबई गुन्हे शाखेकडून ताब्यात

पश्चिम बंगालमधील बेरहामपुर येथे बॉम्बफेक प्रकरणातील दोन संशयित आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने बोरीवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे.

May 18, 2026 - 22:49
 0  65
पश्चिम बंगाल बॉम्बफेक प्रकरणातील दोन आरोपी मुंबई गुन्हे शाखेकडून ताब्यात
मुंबई गुन्हे शाखा, पश्चिम बंगाल बॉम्बफेक, बेरहामपुर प्रकरण

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. १८ मे २०२६ :

पश्चिम बंगालमधील बेरहामपुर येथे संवेदनशील परिसरात बॉम्बफेक प्रकरणातील दोन पाहिजे आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने शिताफीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे.

बेरहामपुर, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल येथे अज्ञात व्यक्तींनी बॉम्बफेक केल्याप्रकरणी बेरहामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२६/२६ दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांसह स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते. दरम्यान, कोलकाता येथून मुंबईकडे गीतांजली एक्सप्रेसने आरोपी प्रवास करणार असल्याची खात्रीलायक माहिती मुंबई गुन्हे शाखेला १६ मे रोजी प्राप्त झाली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक आणि कक्ष-५ यांच्या संयुक्त पथकाने दादर ते बोरीवली रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. शोधमोहीमेदरम्यान बोरीवली रेल्वे स्थानक येथे दोन संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले.

सखोल चौकशीत त्यांचा पश्चिम बंगालमधील बॉम्बफेक प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बेरहामपुर पोलीस ठाण्याचे विशेष पथक मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही आरोपींचा ताबा घेतला.

१७ मे रोजी आरोपींना किल्ला कोर्ट, मुंबई येथील सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी

रॉकी खान (वय २३) – रा. बेरहामपूर, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल

शाहदत सरकार (वय ३५) – रा. बेरहामपूर, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0