एकल महिलांच्या सशक्तीकरणाला जिल्हा परिषदेचे प्राधान्य; डॉ. जसमिन यांची ग्वाही
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1.08 लाख एकल महिला असून त्यांच्या सशक्तीकरण व सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद प्राधान्याने काम करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जसमिन यांनी सांगितले. एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत विविध प्रश्नांवर चर्चा करून उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
कोल्हापूर प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असून त्यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जसमिन यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावरील समिती सभागृहात एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील एकल महिलांसमोरील विविध समस्या, आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. जसमिन म्हणाल्या की, कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे एक लाख आठ हजार एकल महिला आहेत. त्यांच्या समस्यांचा सर्वांगीण विचार करून प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. एकल महिला धोरणाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत होत्या. यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती विद्या पाटील यांनी एकल महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त झाल्यास त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मोठी मदत होईल, असे मत व्यक्त केले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
प्रारंभी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग) नितीन मस्के यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना एकल महिलांना भेडसावणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक समस्यांचा आढावा घेतला.
या कार्यशाळेला अर्थ व शिक्षण सभापती सारिका नांदेकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सावर्डेकर, आलोक अग्रहरी, एस.एस. दाडे यांच्यासह सर्व तालुक्यांतील बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO), एकल महिला प्रश्नांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0