रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी 64 महाराष्ट्र एनसीसी बटालियनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
64 महाराष्ट्र एनसीसी बटालियन, नाशिकतर्फे रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. "Yoga for Self and Society" या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात एनसीसी कॅडेट्स, अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले.
नाशिक ब्यूरो: 64 महाराष्ट्र एनसीसी बटालियन, नाशिकतर्फे 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन "Yoga for Self and Society" या संकल्पनेवर रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी आयोजित करण्यात आलेल्या मुख्य योगसत्रात एनसीसी कॅडेट्स, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योग प्रात्यक्षिकाने करण्यात आली. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल चारूदत्त रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी, एएनओ, पीआय स्टाफ तसेच मोठ्या संख्येने एनसीसी विद्यार्थ्यांनी योगसत्रात सहभाग घेतला.
योग प्रशिक्षकांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन तसेच विविध प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी त्यांनी या योगप्रकारांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्वही स्पष्ट केले. उपस्थित कॅडेट्स आणि नागरिकांनीही उत्साहाने योगाभ्यास करून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना लेफ्टनंट कर्नल चारूदत्त रानडे म्हणाले, “योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून निरोगी मन, सकारात्मक विचार आणि संतुलित जीवनशैलीचा आधार आहे. नियमित योगाभ्यासामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. ‘स्व’पासून समाजापर्यंत योगाचा संदेश पोहोचविणे हीच खरी देशसेवा आहे.”
या कार्यक्रमात नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांतील 12 एनसीसी युनिट्सच्या कॅडेट्सनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. योग दिनाच्या निमित्ताने आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात
आला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0