खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक; ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावरील कार्यशाळा संपन्न

पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. राज्यातील खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. यामुळे पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Jun 2, 2026 - 22:09
Aug 27, 2026 - 15:16
 0  4
खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक; ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावरील कार्यशाळा संपन्न
भारत पशुधन प्रणाली, गोजातीय प्रजनन व नियमन

पुणे, प्रतिनिधी : राज्यातील खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंद भारत पशुधन प्रणाली (Bharat Livestock System) वर करणे आवश्यक असून, त्यामुळे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांची अचूक सांख्यिकीय माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा आणि गुणवत्ता अधिक वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन आयुक्त तथा महाराष्ट्र गोजातीय प्रजनन व नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले.

औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू हॉलमध्ये ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विविध तज्ज्ञ अधिकारी, सेवा पुरवठादार आणि संस्थात्मक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची प्रभावी अंमलबजावणी, कृत्रिम रेतन (AI) सेवा, नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंगचे तांत्रिक एकत्रीकरण आणि राज्य व केंद्र सरकारच्या भावी धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त व प्राधिकरणाचे सदस्य डॉ. देवेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. कृत्रिम रेतन सेवा आणि NDLM अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंगची आवश्यकता अधोरेखित करत त्यांनी पारदर्शकता वाढविण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

राज्यात उच्च उत्पादनक्षम पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगून, खाजगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी विभागासोबत समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच या प्रक्रियेत विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यशाळेच्या उत्तरार्धात विविध संस्थांतील तज्ज्ञांनी तांत्रिक सादरीकरणे केली. बाफ, पुणे येथील डॉ. जयंत खडसे यांनी गोजातीय पैदाशीतील अनुभव मांडले. तर चितळे-ABS जेनस प्रा. लि.चे डॉ. परिक्षित देशमुख यांनी ‘जेनोमिक्स आणि सेक्स्ड सिमेन’ या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गोवंश उत्पादकता कशी वाढविता येईल याबाबत माहिती दिली.

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. राजू कोलते यांनी भारत पशुधन प्रणालीच्या उपयुक्ततेविषयी आणि वापराबाबत मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रानंतर उपस्थित प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये विविध मुद्द्यांवर खुली चर्चा झाली.

कार्यक्रमाचा समारोप उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. प्रशांत भड यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.