वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा; नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करा — आयुक्त अश्विनी भिडे
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वायू प्रदूषण नियंत्रणासाठी वेळीच प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ‘पादचारी प्रथम’ अभियानात सातत्य, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणांवर उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आतापासूनच प्रभावी नियोजन करा
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आगामी काळात वेळीच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. श्रीगणेशोत्सवाच्या काळात ज्या पद्धतीने उत्तम नियोजन आणि पूर्वतयारी करण्यात आली, त्याच पद्धतीने वायू प्रदूषण नियंत्रणासाठीही प्रभावी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांचे कामकाज, प्रकल्प आणि उपक्रमांचा मासिक आढावा घेण्यासाठी १८ सप्टेंबर २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्त श्रीमती भिडे बोलत होत्या.
पावसाळ्याच्या काळात विविध विभागांनी पूर्वतयारी करून केलेल्या उपाययोजनांमुळे त्याचे प्रभावी परिणाम दिसून आले. त्याचप्रमाणे श्रीगणेशोत्सवाच्या अनुषंगानेही नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
१ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विशेष अभियान
सध्या मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) नियंत्रणात असला, तरी आगामी काळात त्यामध्ये वाढ होऊ नये यासाठी आतापासूनच आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियंत्रणासाठी जारी केलेल्या २८ मुद्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबवून रस्ते धुणे, मोठ्या प्रकल्पांच्या परिसराला आवरण लावणे आदी उपाययोजना पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
वायू गुणवत्ता निर्देशांक वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
‘पादचारी प्रथम’ अभियानात सातत्य ठेवण्याच्या सूचना
मुंबईतील पदपथ नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि अडथळामुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानासाठी महापालिकेने सुमारे ३०७ किलोमीटर लांबीचे २०० पदपथ निवडले आहेत. या पदपथांवरील विविध अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांना सुरक्षितपणे आणि सुलभतेने वापरता यावेत, यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.
विविध प्रशासकीय विभागांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचे दृश्य परिणाम जाणवत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. मात्र, अभियान अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी या कार्यवाहीत सातत्य ठेवावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
‘मार्ग’ प्रणालीवरील तक्रारींचे प्राधान्याने निराकरण
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या नागरी समस्यांबाबतच्या तक्रारी या महापालिकेच्या कामकाजाचे वास्तव मूल्यमापन करणाऱ्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
महानगरपालिकेने नागरिकांच्या तक्रारींच्या व्यवस्थापनासाठी ‘मार्ग’ (Management and Redressal of Grievance) प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीवर आतापर्यंत ८७ हजार ४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी सुमारे ६४ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यांचे वेळेत आणि योग्य पद्धतीने निराकरण करावे. तसेच ज्या स्तरावर तक्रारींचे निराकरण होणे अपेक्षित आहे, त्याच स्तरावर त्या सोडविण्यात याव्यात, अशा सूचनाही आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिल्या.
वाहतूक कोंडीच्या १३९ ठिकाणांवर उपाययोजना
मुंबईतील काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अशा प्रकारची सुमारे १३९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
या ठिकाणच्या समस्यांचा सखोल आणि योग्यप्रकारे अभ्यास करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
तसेच या ठिकाणी असलेली बांधकामे नियमानुसार निष्कासित करण्याची कार्यवाही करून वाहतुकीचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर उप आयुक्तांनी लक्ष द्यावे
मुंबईत रस्ते, पूल, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या आदी क्षेत्रांशी संबंधित विविध प्रकल्प मध्यवर्ती विभागांमार्फत राबविण्यात येत आहेत.
या प्रकल्पांच्या प्रगतीवर आणि प्रत्यक्ष कामकाजावर संबंधित परिमंडळांच्या उप आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून प्रकल्प निर्धारित वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण होतील, असे निर्देश देण्यात आले.
विविध प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधित व्यक्तींची (PAP) यादी संबंधित विभागांनी विहित वेळेत सादर करावी. यामुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणारा संभाव्य विलंब टाळता येईल आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित
या मासिक आढावा बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) श्री. देवेंदर सिंग, उप आयुक्त (आयुक्त यांचे कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड यांच्यासह सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, विभागप्रमुख, खातेप्रमुख आणि संचालक उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0