दिघी फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद; १ पिस्तूल व १ जिवंत काडतूस जप्त
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आणि पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत ७० पेक्षा अधिक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तसेच पोलिस पथकावर फायरिंग करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
१३ मे २०२६ रोजी दिघी पोलीस स्टेशन हद्दीत फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी शेखर संभाजी जाधव आणि त्याचे साथीदार फरार होते. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. तपासादरम्यान मुख्य आरोपी शेखर संभाजी जाधव व त्याचा साथीदार रांजणगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर आरोपींनी फायरिंग करून उसाच्या शेताचा फायदा घेत पळ काढला होता. त्यानंतर रांजणगाव पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू ठेवला. पोलिस अंमलदार गणेश सावंत व विनोद वीर यांनी सातत्याने तपास करून आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळवली.
१४ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.५० वाजता दिघी परिसरातील मोकळ्या मैदानात सापळा रचून पोलिसांनी मुख्य आरोपी शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. मोगा, ता. उदगीर, जि. लातूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ५१ हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला पुढील कारवाईसाठी दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0