दिव्य चेतना सोशल फाउंडेशनची शैक्षणिक मुसंडी; ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे धनादेश वाटप
दिव्य चेतना सोशल फाउंडेशनच्या वतीने नाशिक येथे ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे धनादेश वितरित करण्यात आले. पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्था सातत्याने कार्यरत असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतही यावेळी करण्यात आली.
नाशिक | ब्यूरो
दिव्य चेतना सोशल फाउंडेशनच्या वतीने यावर्षी ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे धनादेश (चेक) वाटप करण्याचा कार्यक्रम रविवारी गोविंदनगर येथील रामबंधू मसाला मुख्य कार्यालयात उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्रीरंग सारडा उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर ब्राम्हणकर, उपाध्यक्ष कांता राठी, सरचिटणीस प्राचार्य प्रशांत पाटील, संचालक अरविंद महापात्रा, कैलास पाटील, संस्थेचे कामकाज पाहणारे चंद्रकांत दीक्षित, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष मधुकर ब्राम्हणकर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, नाशिक जिल्ह्यात कोणत्याही कारणाने पालक गमावलेल्या सुमारे २५० विद्यार्थ्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची फी दिव्य चेतना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भरली जात आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरचिटणीस प्राचार्य प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरंग सारडा यांनी विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन करत विविध क्षेत्रात कौशल्य विकसित करून उज्ज्वल करिअर घडविण्याचे आवाहन केले.
संस्थेचे संचालक अरविंद महापात्रा यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा प्रवास आणि अभ्यासाच्या पद्धती इतर विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.
कार्यक्रमात फाउंडेशनच्या विद्यार्थिनी अनुजा कुटे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिने पुण्यातील अभियांत्रिकी शिक्षणात ९.६ सीजीपीए मिळवून इन्फोसिस कंपनीत वार्षिक १६ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड मिळविली आहे.
तसेच संस्थेचा विद्यार्थी मयूर दिंडे याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्याच्या पुढील शिक्षणासाठी गजानन फाउंडेशनतर्फे १ लाख रुपये आणि दिव्य चेतना सोशल फाउंडेशनतर्फे वसतिगृह खर्चासाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
यावेळी संस्थेने यापूर्वी गरजू पालक महिलांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचे वाटप केले असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष कांता राठी यांनी आभार मानताना विद्यार्थ्यांशी अधिक संवाद वाढवून त्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0