नाशिकमध्ये धार्मिक वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव; ऐतिहासिक शृंगेरी शंकराचार्य मठात गुरुपूजन

नाशिकच्या पंचवटीतील ऐतिहासिक शृंगेरी शंकराचार्य मठ, महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान तसेच विविध दत्त मंदिर आणि धार्मिक संस्थांमध्ये वेदमंत्रांच्या घोषात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

Jul 29, 2026 - 22:13
Jul 29, 2026 - 22:57
 0  11
नाशिकमध्ये धार्मिक वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव; ऐतिहासिक शृंगेरी शंकराचार्य मठात गुरुपूजन
गुरुपौर्णिमा नाशिक, शृंगेरी शंकराचार्य मठ, पंचवटी, काळाराम मंदिर,

नाशिक ब्यूरो: 

नाशिक : गुरुपौर्णिमेनिमित्त नाशिकच्या पंचवटी परिसरातील ऐतिहासिक शृंगेरी शंकराचार्य मठ, वेदविद्येचे प्रशिक्षण देणारे महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान तसेच शहरातील विविध धार्मिक संस्था आणि दत्त मंदिरांमध्ये वेदमंत्रांच्या घोषात व भक्तिमय वातावरणात गुरुपूजन करण्यात आले. विविध ठिकाणी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुचरणी श्रद्धा व्यक्त केली.

पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरात असलेल्या ऐतिहासिक शृंगेरी शंकराचार्य मठाला नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीतील शंकराचार्य परंपरेमधील 28 वे शंकराचार्य श्री अभिनव सच्चिदानंद भारती आणि 29 वे शंकराचार्य श्री नरसिंह भारती यांचे या मठात वास्तव्य होते. या दोन्ही शंकराचार्यांच्या समाधी याच ठिकाणी असल्याने नाशिकमधील या मठाला कर्नाटकातील श्री शृंगेरी शंकराचार्य मठाइतकेच धार्मिक महत्त्व असल्याचे जाणकार सांगतात.

गुरुपौर्णिमेनिमित्त पंचवटीतील महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांच्या वेदमंत्र पठणात गुरुपूजनाचा कार्यक्रम धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अयोध्येतील पूजेचे पौरोहित्य करणारे पुरोहित रवींद्र शास्त्री पैठणी यांची उपस्थिती होती.

नाशिकच्या पंचवटीतील शृंगेरी शंकराचार्य मठातील गुरुपूजन कार्यक्रमाचे संचालन मठाचे श्री राम गोपाल अय्यर यांनी केले. यावेळी भाविकांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगताना अयोध्या मंदिरातील विविध पूजांचे पौरोहित्य करणारे ज्येष्ठ पुरोहित आणि हिंदू धर्माचे अभ्यासक शांताराम शास्त्री भनोसे गुरुजी यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले.

गुरु हे माणसाला अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारे मार्गदर्शक आहेत. विज्ञानाच्या पलीकडे जाणारे ज्ञान गुरूकडून प्राप्त होते. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे भनोसे गुरुजी यांनी सांगितले.

नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही शृंगेरी मठाचे विशेष महत्त्व आहे. या मठाला कुंभमेळ्याचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, कुंभमेळ्यादरम्यान विविध आखाड्यांतील साधू-महंतांना शृंगेरी मठाकडून आशीर्वाद व विविध प्रकारचे सहकार्य केले जाते.

शृंगेरी शंकराचार्यांच्या वास्तव्याबरोबरच या मठाला समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाची परंपराही असल्याचे जाणकार सांगतात. या मठाला इतिहासकालीन मोठी परंपरा असून, शंकराचार्यांनी या ठिकाणी वास्तव्य व चातुर्मास करून तत्कालीन कुंभमेळ्यात सहभाग घेतल्याचेही सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या काळापूर्वीचा इतिहास या मठाला लाभल्याचेही धार्मिक अभ्यासकांचे मत आहे.

कर्नाटकातील श्री शृंगेरी मठामध्ये दर्शनासाठी जाणे शक्य नसलेले अनेक भाविक नाशिकमधील शृंगेरी शंकराचार्य मठात दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात. गुरुपौर्णिमेनिमित्त मठात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, नाशिक शहरातील विविध धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांमध्येही गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये गुरुपूजन, धार्मिक विधी आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.