घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी मुंबईत विविध उपक्रम; प्रत्येक विभागातील तिरंगा रॅलीत सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन
‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत मुंबईत तिरंगा रॅली, ई-बाइक रॅली, ‘वंदे मातरम्’ प्रदर्शन आणि विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.
प्रतिनिधी ; नरेश शिंदे
मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२६ : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला मुंबईतही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अभियानाला विशेष स्वरूप देण्यात आले असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. मुंबईतील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून या राष्ट्रीय अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रत्येक विभागात तिरंगा रॅली आणि ई-बाइक रॅली
‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये अर्थात वॉर्ड स्तरावर तिरंगा रॅली आणि ई-बाइक रॅली आयोजित करण्यात येत आहेत.
तसेच ‘वंदे मातरम्’ प्रदर्शन, ‘मातरम्’ रांगोळी यांसारखे विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत. मुंबईकरांनी आपल्या परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना व्यक्त करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिका शाळा-महाविद्यालयांतही देशभक्तीपर कार्यक्रम
महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ध्वजारोहण कार्यक्रम तसेच ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन करण्यात येणार आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण
केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यंदा ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने या अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे, भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढविणे आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्साह व्यापक स्वरूपात साजरा करणे, या उद्देशाने देशभर विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरातही हे अभियान व्यापक स्वरूपात आणि उत्साहात राबविण्यात येत आहे.
राष्ट्रध्वजासोबत सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन
नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून त्यासोबत सेल्फी काढावी आणि ती ‘हर घर तिरंगा’च्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या अभियानात सेल्फीसोबत ‘वंदे मातरम्’ गीताचे बोल असलेली विशेष व्हिडिओ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभियानाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी तसेच स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी हर घर तिरंगा – अधिकृत संकेतस्थळ येथे भेट द्यावी.
मुंबईतील नागरिकांनी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा तसेच परिसरातील तिरंगा रॅली व अन्य देशभक्तीपर उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0