जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य; केंद्रीय विद्यालय प्रस्तावालाही गती – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या विविध समस्या सोडविण्यास जिल्हा प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली. जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या बैठकीत केंद्रीय विद्यालयाचा प्रस्ताव, तालुकास्तरीय समित्या आणि अशासकीय सदस्यांना ओळखपत्र देण्यासह विविध विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
कोल्हापूर | प्रतिनिधी उमेश जाधव
जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडविण्यास जिल्हा प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली. राजर्षी शाहूजी सभागृहात आयोजित जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले की, माजी सैनिकांच्या विविध प्रशासकीय अडचणी तातडीने सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून तो संबंधित सब एरिया कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीत अशासकीय सदस्यांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी यांनी आवश्यक नियमांचा अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
यावेळी निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुडे यांनी शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय सैनिक कल्याण समिती स्थापन करण्याची मागणी केली. या मागणीसही जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार यांनी जिल्ह्यातील माजी सैनिकांची माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १४ हजार ४०० माजी सैनिक असून, सुमारे ६ हजार २४८ दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी विविध शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत.
बैठकीस सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, अशासकीय सदस्य जितेंद्र खोत, दशरथ पाटील, संजय माने, दत्तात्रय मोहिते, संजय पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या बैठकीत माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विविध उपाययोजना, शासकीय सुविधा आणि प्रशासकीय समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0