१५ ऑगस्टपर्यंत जिल्हा नशामुक्त करण्याचा संकल्प; ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका मंजूर करणार ठराव
नशामुक्त कोल्हापूर' अभियानांतर्गत १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी नशामुक्तीचे ठराव मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अभियानांतर्गत पोलिसांनी आतापर्यंत १२४ गुन्हे दाखल करून ८४ लाख रुपयांहून अधिक किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. १७ : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या 'नशामुक्त कोल्हापूर' अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी नशामुक्तीचे ठराव मंजूर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. अभियानांतर्गत पोलिसांनी आतापर्यंत १२४ गुन्हे दाखल करून ८४ लाख १२ हजार १०१ रुपयांचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अभियानाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह पोलीस, परिवहन, आरोग्य, महापालिका, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रत्येक गाव आणि प्रत्येक प्रभाग नशामुक्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव मंजूर करून १५ ऑगस्टपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्देश दिले.
याशिवाय शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि आयटीआय परिसरातील १०० मीटर परिसराचे सीमांकन करून तेथील पानटपऱ्या हटविणे, शाळांमध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती करणे, प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती सत्रांचे आयोजन करणे आणि विविध विभागांनी राबविलेल्या उपक्रमांचा नियमित आढावा सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले की, १५ जुलैअखेर १२४ गुन्हे दाखल करण्यात आले असून ८२ गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच २१३ किलो गांजा, ४० किलो अफूची झाडे आणि ९५ ग्रॅम एमडी (MD) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण ₹८४,१२,१०१ किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्या कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही पोलीस अधीक्षकांनी दिल्या.
गोपनीय माहिती देण्यासाठी विशेष हेल्पलाइन
अंमली पदार्थांचे सेवन, विक्री किंवा साठवणुकीबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांनी ९८२२७६६१०० हा विशेष दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संशयास्पद हालचाली अथवा अंमली पदार्थांशी संबंधित माहिती नागरिकांनी तात्काळ या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
#नशामुक्तकोल्हापूर हॅशटॅगद्वारे जनजागृती
'नशामुक्त कोल्हापूर' अभियानाची जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात राबविण्यात आलेल्या नशामुक्ती उपक्रमांची माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर #नशामुक्तकोल्हापूर या अधिकृत हॅशटॅगसह शेअर करून या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0