लोकमान्य हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन; कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांचा सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम

लोकमान्य हॉस्पिटलमधील ४०० कर्मचाऱ्यांना १० ते ११ महिन्यांचा पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले असून कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

May 24, 2026 - 04:28
 0  6
लोकमान्य हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन; कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांचा सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम
लोकमान्य हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड बातमी, कर्मचारी आंदोलन

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) दि. २३ मे २०२६ : गेल्या चार दशकांपासून रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमधील जवळपास ४०० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून गेल्या १० ते ११ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. कोरोना काळातील थकीत मानधन आणि प्रलंबित वेतन तातडीने देण्याच्या मागणीसाठी कर्मचारी एकवटले असून आंदोलनाला आता व्यापक स्वरूप येण्याची शक्यता आहे.

आंदोलनस्थळी उपस्थित राहून राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करत आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या.

माध्यमांशी संवाद साधताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, व्ही. जी. वैद्य (चेअरमन) आणि एन. व्ही. वैद्य (प्रमुख डायरेक्टर) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले ट्रस्टचे हॉस्पिटल नव्या व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. संबंधित हॉस्पिटल प्रसिद्ध सह्याद्री समूहाने विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे.

कामगारांच्या म्हणण्यानुसार, व्यवस्थापन बदलल्यानंतर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांऐवजी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्याची भूमिका घेतली गेली. यामुळे अनेक वर्षे सेवा देणारे तसेच कोरोना महामारीच्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत काम करणारे कर्मचारी मोठ्या संकटात सापडले आहेत.

कामगारांच्या प्रलंबित वेतनाबाबत कामगार आयुक्त कार्यालय, प्रशासन आणि विविध स्तरांवर अनेक बैठका झाल्या. तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीतही मध्यस्थीचे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. पोलिस प्रशासनानेही कामगारांना किमान थकीत पगार देण्याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, कामगारांच्या आरोपानुसार अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असून इंडस्ट्रियल कोर्टात यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.

दरम्यान, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी पोलिसांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान सोमवारपर्यंत पगाराबाबत निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.

आंदोलनकर्त्यांनी सह्याद्री समूहाच्या नेतृत्वाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली असून कामगारांच्या प्रलंबित वेतनाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मात्र, सोमवार (दि. २५) पर्यंत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी दिला आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0