महागाव तालुक्यात खळबळ! ऊटीत मध्यरात्री घरफोडी; १४ लाखांचा ऐवज लंपास
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील ऊटी येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरात घरफोडी करून तब्बल १४ लाखांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी आरोपींचा अद्याप सुगावा लागलेला नाही.
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी | रवि वाघमारे
यवतमाळ : महागाव तालुक्यातील ऊटी गावात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरात शिरून तब्बल १४ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऊटी येथील शेतकरी व व्यापारी राजू नानाराव गावंडे हे आपल्या कुटुंबासह घरी झोपेत असताना चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी घरातील सोने-चांदीचे दागिने, सुमारे दीड लाखांची रोकड तसेच सुमारे ७५ हजार रुपये किंमतीची पल्सर दुचाकी असा एकूण अंदाजे १४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
विशेष म्हणजे चोरट्यांनी केवळ मौल्यवान वस्तूंनाच लक्ष्य केल्यामुळे ही चोरी सराईत टोळीने केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाने तपास सुरू केला. मात्र अद्यापपर्यंत चोरट्यांचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.
या घटनेमुळे ऊटी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अनिकेत गावंडे यांच्या फिर्यादीवरून महागाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

