जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशासह परकीय गुंतवणूक क्षमतेचे प्रभावी सादरीकरण

महाराष्ट्र, जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शन, परकीय गुंतवणूक, एफडीआय, देवेंद्र फडणवीस, जीजेईपीसी, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, हापूस आंबा, हस्तकला, महिला बचत गट, शबरी ब्रँड, निर्यात, सांस्कृतिक वारसा

May 12, 2026 - 02:57
 0  10
जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशासह परकीय गुंतवणूक क्षमतेचे प्रभावी सादरीकरण
महाराष्ट्र, जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शन, परकीय गुंतवणूक, एफडीआय,

मुंबई, दि. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संपर्क’ विभागाच्या माध्यमातून मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू झालेल्या ‘जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनात’ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशासोबत राज्याच्या परकीय गुंतवणूक क्षमतेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

११ ते १४ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘किंबरली प्रोसेस इंटरसेशनल मिटिंग’मध्ये सुमारे २०० विदेशी प्रतिनिधी सहभागी झाले असून, त्यांच्या समोर महाराष्ट्रातील पारंपरिक उत्पादने, कृषी वैभव, हस्तकला आणि निर्यातक्षम उद्योगांचे विशेष दालन उभारण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या नव्या ‘परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संपर्क’ विभागामार्फत महाराष्ट्रात अधिकाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर राज्याची आर्थिक व सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या प्रदर्शनात कोकणातील भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंबा, हातमाग उत्पादने, ग्रामीण महिला बचत गटांची उत्पादने, आदिवासी विकास विभागाच्या ‘शबरी’ ब्रँडअंतर्गत वस्तू तसेच पारंपरिक हस्तकलेचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले आहे. विदेशी प्रतिनिधींना महाराष्ट्राची संस्कृती जवळून अनुभवता यावी यासाठी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत शासकीय प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे.

या उपक्रमात पणन, ग्रामविकास, आदिवासी विकास, वस्त्रोद्योग आणि हातमाग क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांचा सहभाग असून, स्थानिक उत्पादने आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जीजेईपीसीमार्फत विदेशी प्रतिनिधींना हापूस आंब्यांच्या भेटवस्तू देण्यात आल्याने महाराष्ट्राच्या कृषी व निर्यात क्षमतेचे प्रभावी ब्रँडिंग होत आहे.

रत्न आणि दागिने उद्योगात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असून, देशाच्या एकूण रत्न-दागिने निर्यातीपैकी सुमारे ४७ टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते. अत्याधुनिक कटिंग, पॉलिशिंग आणि डिझाईन क्षमतेमुळे महाराष्ट्राने जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

राज्य शासनाच्या या उपक्रमातून स्थानिक कौशल्य, पारंपरिक वारसा आणि आधुनिक उद्योग यांची सांगड घालत महाराष्ट्राला जागतिक गुंतवणूक, निर्यात आणि सांस्कृतिक सहकार्याच्या नव्या पर्वाकडे नेण्याचा प्रयत्न अधोरेखित होत असल्याचे विभागाचे सचिव डॉ. राजेश गावंडे यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0