पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; महापौर रवि लांडगे यांचा सायकलने प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी निवासस्थानापासून महापालिकेपर्यंत सायकलने प्रवास केला. नागरिकांनीही सायकलचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. १५ मे २०२६ :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज आपल्या निवासस्थानापासून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत सायकलने प्रवास केला.
महापौर रवि लांडगे यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकलने प्रवास करत नागरिकांना इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. यावेळी महापालिकेचे सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप अभियंता अमित दीक्षित, महापौरांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले आणि संदीप पालांडे हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या संदेशातून प्रेरणा घेत हा सायकल प्रवास करण्यात आला आहे. पुढे आठवड्यातून एक दिवस सायकलने प्रवास करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दैनंदिन जीवनात सायकलचा वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इंधन बचतीच्या सवयी अंगीकारून पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सायकलचा वापर हा केवळ इंधन बचतीसाठीच नव्हे, तर निरोगी जीवनशैली, स्वच्छ हवा आणि पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाचा असल्याचे महापौरांनी नमूद केले. इंधन बचत हीच खरी राष्ट्रसेवा असून पर्यावरणाचे संरक्षण आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात छोटे सकारात्मक बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हरित उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध मोहिमा राबवत असून नागरिकांनीही या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही महापौर रवि लांडगे यांनी यावेळी केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0