मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर ११ दिवसांत २,४९९ मेट्रिक टन कचरा हटवला; महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी
मुंबई महापालिकेने ९ ते १९ जुलै २०२६ दरम्यान राबविलेल्या विशेष समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत २,४९८.६६ मेट्रिक टन कचरा हटवला. जुहू, गिरगाव, दादर, मढ, वेसावे आणि गोराई समुद्रकिनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मुंबई | प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ९ जुलै ते १९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवून २,४९८.६६ मेट्रिक टन कचरा हटविण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मान्सून काळातील मोठ्या भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेला प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती आणि इतर घनकचरा तातडीने हटवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. विशेषतः १४ ते १८ जुलै या कालावधीत समुद्राला ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येण्याचा अंदाज असल्याने विशेष स्वच्छता नियोजन करण्यात आले होते.
जुहू समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक कचरा
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध समुद्रकिनाऱ्यांवरून खालीलप्रमाणे कचरा संकलित करण्यात आला.
जुहू समुद्रकिनारा – १,८२५ मेट्रिक टन
वेसावे समुद्रकिनारा – २७७.६० मेट्रिक टन
दादर–माहीम समुद्रकिनारा – १५२.१० मेट्रिक टन
चिंबई–वारिंगपाडा – १२७.२० मेट्रिक टन
मढ–मार्वे समुद्रकिनारा – ४४.२८ मेट्रिक टन
गोराई समुद्रकिनारा – ३८.८२ मेट्रिक टन
गिरगाव चौपाटी – ३३.६६ मेट्रिक टन
मान्सून काळात विशेष पथके कार्यरत
महापालिकेने मान्सून काळात समुद्रातून वाहून येणारा कचरा तातडीने हटविण्यासाठी विशेष स्वच्छता पथके, यंत्रसामग्री, वाहने आणि आवश्यक मनुष्यबळ तैनात केले आहे. ही पथके नियमितपणे समुद्रकिनाऱ्यांची पाहणी करून कचरा संकलित करत असून त्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावत आहेत.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
मुंबईचे समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिक व इतर कचरा समुद्रकिनाऱ्यावर टाकू नये तसेच महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिक आणि पर्यटकांना अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0