मुंबईतील फेरीवाल्यांना लवकरच क्यूआर कोड आधारित ओळखपत्र; महापौर रितू तावडे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना लवकरच क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरित करण्यात येणार आहे. नगर पथविक्रेता समितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ९९ हजारांहून अधिक फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून महापौर रितू तावडे यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबई, दि. ३ जून : मुंबई महानगरातील नगर पथविक्रेता अर्थात फेरीवाल्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापौर Ritu Tawde यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येत असून, लवकरच पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरित करण्यात येणार आहे.
महापौर रितू तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन, नियोजित हॉकिंग झोनची निर्मिती, फेरीवाला समितीची स्थापना आणि फेरीवाल्यांना अधिकृत परवाना व ओळखपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या दिशेने प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
१०० दिवसांच्या प्राधान्यक्रमात फेरीवाला प्रश्नाचा समावेश
महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तयार करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या प्राधान्यक्रम आराखड्यात फेरीवाल्यांच्या प्रश्नांचा विशेष समावेश करण्यात आला. फेरीवाला धोरणाची सद्यस्थिती, त्यातील अडचणी आणि उपाययोजना यांचा सखोल आढावा घेऊन विविध विभागांशी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
नगर पथविक्रेता समितीची प्रक्रिया पूर्ण
ऑगस्ट २०२४ मध्ये नगर पथविक्रेता समितीची निवडणूक पार पडली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे मतमोजणी रखडली होती. यासाठी अनुज्ञापन आणि विधी विभागांच्या संयुक्त बैठका घेऊन न्यायालयाकडे मतमोजणी प्रक्रियेसाठी परवानगी मागण्यात आली.
महानगरपालिकेच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि न्यायालयाने मतमोजणीस परवानगी दिल्यानंतर २८ मार्च २०२६ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे नगर पथविक्रेता समित्यांच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
अशासकीय सदस्य नियुक्तीची प्रक्रिया सुरू
निवडून आलेल्या सदस्यांसोबत समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी वर्तमानपत्रांमधून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी आणि पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू आहे.
९९ हजारांहून अधिक फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र
माननीय न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि नगर पथविक्रेता अधिनियमाच्या तरतुदीनुसार मुंबईतील ९९ हजार ३४५ पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला असून ओळखपत्र वितरणाची कार्यवाही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच पात्र फेरीवाल्यांना अधिकृत ओळखपत्रे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.
सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध
फेरीवाल्यांशी संबंधित सर्व प्रश्न न्याय्य पद्धतीने सोडविण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. कोणत्याही पात्र फेरीवाल्यावर अन्याय होऊ नये आणि लाभार्थी योजनांपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी प्रशासन सर्वसमावेशक पद्धतीने कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील फेरीवाल्यांना अधिकृत ओळख, नियोजनबद्ध पुनर्वसन आणि सुरक्षित व्यवसायाचे वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1

