सेवेच्या पलीकडे, विश्वासाचे नाते” : नमस्ते नाशिक फाउंडेशनचा सप्रेवाडीत सामाजिक उपक्रम

नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील सप्रेवाडी येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कुपोषित बालकाच्या कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य, महिलांना व विद्यार्थिनींना स्कार्फ वाटप तसेच आरोग्य आणि शिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Apr 29, 2026 - 18:29
 0  2
सेवेच्या पलीकडे, विश्वासाचे नाते” : नमस्ते नाशिक फाउंडेशनचा सप्रेवाडीत सामाजिक उपक्रम
नमस्ते नाशिक फाउंडेशन, सप्रेवाडी उपक्रम, स्नेहल देव, इगतपुरी

नाशिक ब्यूरो 

नाशिक : “बदल फक्त तेव्हाच होऊ नये जेव्हा आपण एखाद्याला गमावण्याच्या उंबरठ्यावर असतो; खरं प्रेम शेवटच्या क्षणी दिलेल्या वचनात नसून ते रोजच्या छोट्या कृतींमधून दिसते,” या भावनेतून नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील सप्रेवाडी येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात गावातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. कुपोषित बालकाच्या कुटुंबाला संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

तसेच गावातील रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना आणि शाळेत जाणाऱ्या मुलींना उन्हापासून संरक्षणासाठी स्कार्फचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

शिक्षणाबाबत विशेष मार्गदर्शन

कार्यक्रमादरम्यान सीए लीना नहार आणि सीए राहुल नहार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना, त्यांच्या मुलींना तसेच पुढील पिढीच्या शिक्षणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

यावेळी गावातील महिलांनी सीए लीना नहार आणि वर्षा बम्ब यांना आश्वासन दिले की, येत्या काळात सप्रेवाडी गावातून किमान एक तरी चार्टर्ड अकाउंटंट घडविण्याचा संकल्प पूर्ण केला जाईल.

महिलांच्या आरोग्यावर भर

अध्यक्षा स्नेहल देव यांनी कष्टकरी महिलांना मार्गदर्शन करताना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेण्याचे महत्त्व पटवून दिले. उन्हात काम करताना शरीराचे संरक्षण, पुरेसे पाणी पिणे आणि तब्येत सुदृढ ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच भविष्यात गावात एकही कुपोषित बालक जन्माला येऊ नये यासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

पौष्टिक आहाराबाबत जनजागृती

या वेळी महिलांना पौष्टिक आहाराचे महत्त्व, फळांचे नियमित सेवन आणि त्याचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.

या उपक्रमामुळे गावात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0