नाशिकमध्ये १० ऑगस्टला चतुर्वेद संमेलन व राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार वितरण; राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती
नाशिकमध्ये १० ऑगस्ट रोजी महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने चतुर्वेद संमेलन व धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभरातील ज्येष्ठ वेदशास्त्र पंडितांचा सन्मान होणार आहे.
नाशिक ब्यूरो
नाशिक : महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने ‘चतुर्वेद संमेलन व धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार वितरण सोहळा’ सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटी कॅम्पसमधील ‘गुरुदक्षिणा हॉल’ येथे होणार आहे.
या सोहळ्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भारतीय प्राचीन वैदिक संस्कृतीचे मूळ असलेल्या वेदांचा प्रसार, अध्ययन-अध्यापन आणि जतन करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ वेदशास्त्र पंडितांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
भारतीय वैदिक परंपरेचे संवर्धन, वेदाध्ययनाला प्रोत्साहन आणि वैदिक ज्ञानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने या चतुर्वेद संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वेदांच्या अध्ययन-अध्यापनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या वेदाचार्यांच्या कार्याचा गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार असून, वैदिक संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या विद्वानांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्लीचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी उपस्थित राहणार आहेत. तसेच उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रामाकांत पांडे, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या नाशिक परिसराचे निदेशक नीलाभ तिवारी, धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार समितीचे स्वागताध्यक्ष जयंत भातंबरेकर तसेच महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे सचिव व प्रधानाचार्य वेदाचार्य रवींद्र पैठणे यांची उपस्थिती लाभणार आहे.
यावर्षीच्या ‘राष्ट्रीय वेदशास्त्र पंडित’ पुरस्कारांसाठी देशभरातील वेदविद्या क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय ऋग्वेद पुरस्काराने हैदराबाद येथील वेदाचार्य संतोषकुमार घनपाठी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शुक्ल यजुर्वेद पुरस्कार अहिल्यानगर येथील महेश रेखे घनपाठी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय सामवेद पुरस्कारासाठी चेन्नई येथील वेदाचार्य श्रीकृष्ण श्रौती यांची निवड करण्यात आली असून, राष्ट्रीय अथर्ववेद पुरस्काराने तिरुपती येथील वेदाचार्य रामचंद्र जोशी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच राष्ट्रीय शास्त्र पुरस्कार पुणे येथील वेदाचार्य राजेश्वर देशमुख यांना प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय यजुर्वेद सेवाव्रती पुरस्कारासाठी दुर्गादास मुळे आणि श्यामसुंदर जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय वेद पुरस्काराने वेदाचार्य दंडक्रम विक्रमादित्य देवव्रत रेखे यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. वेदाध्ययन, वैदिक परंपरेचे संवर्धन आणि वेदशास्त्राच्या प्रचारासाठी या सर्व पुरस्कारार्थींनी दिलेल्या योगदानाचा या सोहळ्यात गौरव केला जाणार आहे.
चतुर्वेद संमेलनाच्या माध्यमातून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांच्या अध्ययन, अध्यापन आणि जतनासाठी कार्य करणाऱ्या विद्वानांच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळणार आहे. या कार्यक्रमातून वैदिक ज्ञानपरंपरेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या चतुर्वेद संमेलनाचा लाभ नाशिककर नागरिक, वेदप्रेमी, वैदिक संस्कृतीचे अभिमानी, संस्कृतप्रेमी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष रतन लथ, कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर, वैभव जोशी, दीपक बागड, डॉ. विश्वास देवकर, कुमार भट्ट, रामगोपाल अय्यर, दत्तात्रय पैठणे आणि गोविंद पैठणे यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0