नाशिक जिल्हा रुग्णालयाचा अभिनव ‘टोबॅको क्विटिंग बॉक्स’ उपक्रम; तीन महिन्यांत ४४ किलो तंबाखू जप्त
नाशिक जिल्हा रुग्णालयाने तंबाखूमुक्त परिसरासाठी सुरू केलेल्या ‘टोबॅको क्विटिंग बॉक्स’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन महिन्यांत सुमारे ४४ किलो तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
नाशिक प्रतिनिधी : नाशिक जिल्हा रुग्णालयाने स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य संवर्धन आणि तंबाखूमुक्त परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘टोबॅको क्विटिंग बॉक्स’ या अभिनव उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेंतर्गत मागील तीन महिन्यांत तब्बल ४४ किलो तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली आहे.
ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
प्रवेशद्वारावर तपासणी, तंबाखू थेट बॉक्समध्ये
दररोज बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) सुमारे एक ते दीड हजार रुग्ण व नातेवाईक येत असतात. ‘तंबाखूमुक्त आरोग्य संस्था’ या संकल्पनेतून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रशिक्षित सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.
प्रवेशावेळी प्रत्येकाची तपासणी केली जाते. कोणाकडे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ आढळल्यास ते संबंधित व्यक्तीकडून ‘टोबॅको क्विटिंग बॉक्स’मध्ये टाकून घेतले जातात. तसेच तोंडात तंबाखू असल्यास व्यक्तीस तोंड स्वच्छ धुवून येण्यास सांगितले जाते.
स्वच्छता आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम
या उपक्रमामुळे रुग्णालय परिसरात :
थुंकण्याच्या घटनांमध्ये घट
भिंती व सार्वजनिक जागा स्वच्छ
दुर्गंधी कमी
संसर्गजन्य आजारांचा धोका कमी
तंबाखूबाबत जनजागृती वाढली
असे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
अनेक अधिकाऱ्यांचे समन्वयातून यश
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलेश पाटील, डॉ. शिल्पा बांगर, उज्ज्वला पाटील, समुपदेशक कविता पवार, सुरक्षा प्रमुख रमेश गाडेकर, स्वच्छता निरीक्षक श्री. आरणे व त्यांच्या टीमने विशेष प्रयत्न केले.
सर्व कार्यालयांत राबविण्याची गरज
डॉ. सतीश शिंपी यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ रुग्णालयापुरता मर्यादित न ठेवता शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांतही राबविण्याची गरज आहे. त्यामुळे कार्यस्थळे स्वच्छ राहतील, तंबाखू सेवनावर नियंत्रण येईल आणि थुंकीमुळे पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळेल.
तंबाखूमुक्त समाजासाठी पाऊल
प्रत्येक संस्थेने हा उपक्रम स्वीकारल्यास तंबाखूमुक्त समाज घडविण्यास मोठी चालना मिळेल, असा विश्वास रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0