“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफी नाही”; NEET पेपरफुटी प्रकरणावर NSUI ची आक्रमक भूमिका
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावर नाशिक शहर जिल्हा एनएसयूआय काँग्रेसचे अध्यक्ष अल्तमश शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी आणि दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नाशिक ब्यूरो
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या घटनेविरोधात नाशिक शहर जिल्हा एनएसयूआय काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष अल्तमश शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात या प्रकाराला विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला “क्रूर खेळ” असे संबोधले आहे.
अल्तमश शेख यांनी म्हटले आहे की, दिवस-रात्र मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर अन्याय करणाऱ्या दोषींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास परत मिळवण्यासाठी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षण व्यवस्था पारदर्शक आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारच्या काळात ८९ हून अधिक पेपरफुटीच्या घटना घडल्याचा आरोप करत, “भाजप सरकार ही पेपरफुटीची ओळख बनली आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी एनएसयूआय रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा इशाराही त्यांनी दिला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफी नाही,” असा ठाम संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0