शासकीय सुट्टीतही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची वायसीएम रुग्णालयाला अचानक भेट; आरोग्य सुविधांचा घेतला सखोल आढावा
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शासकीय सुट्टीच्या दिवशी वायसीएम रुग्णालयाला अचानक भेट देत विविध विभागांची पाहणी केली. रुग्णांशी थेट संवाद साधून आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना दिल्या.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १ मे रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) आणि महापालिका पदव्युत्तर संस्थेला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत आरोग्य सुविधा, उपचार व्यवस्था, वैद्यकीय यंत्रणा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
आयुक्तांनी अतिदक्षता विभाग (ICU), नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU), मेडिसिन विभाग, शस्त्रक्रिया विभाग, बालरोग विभाग, अस्थिरोग विभाग, ईएनटी विभाग, दंतचिकित्सा विभाग, अल्ट्रासोनोग्राफी विभाग, क्ष-किरण विभाग, डायलिसिस विभाग, बाह्यरुग्ण विभाग (OPD), आपत्कालीन विभाग तसेच उष्माघात कक्षाची पाहणी केली.
भेटीदरम्यान डॉ. सूर्यवंशी यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधून सुविधा, उपचार सेवा आणि अडचणींबाबत माहिती घेतली. अनेक रुग्णांनी रुग्णालयातील सेवांबाबत समाधान व्यक्त केले. नागरिकांना अधिक सुलभ, तत्पर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, वैद्यकीय सेवा आणि भविष्यातील नियोजन याबाबत सादरीकरण केले.
वायसीएम रुग्णालय हे पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र असून येथे पदव्युत्तर वैद्यकीय संस्था, बी.एस्सी. नर्सिंग संस्था, वायसीएम ब्लड सेंटर, मासुळकर नेत्र रुग्णालय तसेच स्वतंत्र ॲम्ब्युलन्स केंद्र अशा विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध आहेत.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, “रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. नागरिकांना अधिक दर्जेदार, तत्पर आणि सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.”
अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी सांगितले की, “वायसीएम रुग्णालयामार्फत नागरिकांना अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत.”
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0