लोकमान्य टिळक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि माजी महापौर मधुकरराव पवळे यांना महापालिकेकडून अभिवादन
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
पिंपरी, दि. १ ऑगस्ट २०२६ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य निलेश तरस, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, मधुरा शिंदे, ऐश्वर्या तरस, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी नगरसदस्य सचिन चिखले, माजी नगरसदस्या सुमन पवळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, विविध पदाधिकारी, दिवंगत मधुकरराव पवळे यांचे नातेवाईक तसेच नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले. स्वराज्याची संकल्पना जनमानसात रुजविण्यासाठी आणि राष्ट्रीय चेतना जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी केलेले कार्य देशासाठी प्रेरणादायी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या अजरामर साहित्य, प्रभावी शाहिरी आणि सामाजिक कार्यातून वंचित, शोषित, कष्टकरी व बहुजन समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा दिली. सामाजिक समता आणि परिवर्तनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचेही मान्यवरांनी स्मरण केले.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली.
लोकमान्य टिळक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घेऊन समाजहित, सामाजिक समता आणि शहर विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0