पिंपरी चिंचवडमधील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करा; नागरिकांना मूलभूत सुविधा द्या – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. विविध विभागांमध्ये समन्वय वाढवून प्रलंबित कामांना गती देण्यावर भर देण्यात आला.

Apr 28, 2026 - 04:04
 0  2
पिंपरी चिंचवडमधील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करा; नागरिकांना मूलभूत सुविधा द्या – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
पिंपरी चिंचवड बातमी, माधुरी मिसाळ, पिंपरी चिंचवड विकासकामे

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखणे अत्यंत महत्त्वाचे असून सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी शहरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी महापौर रवि लांडगे यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे स्वागत केले. यावेळी विधान परिषद सदस्य उमा खापरे, अमित गोरखे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प, अमृत योजना 2.0, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते विकास, ड्रेनेज सुविधा, मेट्रो प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, चापेकर वाडा, अग्निशमन केंद्र, महिला वसतिगृह, संतपीठ प्रकल्प, नदी सुधार योजना तसेच विविध नागरी प्रकल्पांची माहिती दिली.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगतीदर, निधी वितरण, तांत्रिक अडचणी आणि उपाययोजनांचा सखोल आढावा घेतला. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, तसेच सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि नागरिकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठी कामांना गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचा आढावा घेत लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रस्ते विकास आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा करून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवास सुविधा देण्यावर भर दिला.

यावेळी आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी उगमस्थान ते देहूपर्यंत एसटीपी प्रकल्प राबविण्याची मागणी केली. तसेच घरकुल येथील प्रलंबित सदनिका प्रकल्प पूर्ण करून ड्रेनेज व पाणी सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार शंकर जगताप यांनी शहरातील मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, रेड झोन पॉलिसी कार्यान्वित करावी आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पवना नदीतून थेट पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याची योजना राबवावी, असे मत व्यक्त केले.

आमदार अमित गोरखे यांनी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेल्या घरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, तर उमा खापरे यांनी शहरासाठी विशेष पाणीपुरवठा निधीची मागणी केली.

बैठकीचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार महापौर रवि लांडगे यांनी मानले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.