राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महापालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाला सिल्व्हर अवॉर्ड

पुणे महानगरपालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ डिजिटल परिवर्तन प्रकल्पाची राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ अंतर्गत सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड झाली आहे. नागरिकाभिमुख सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रशासनातील नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे पुणे महापालिकेला हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.

Jun 6, 2026 - 01:38
 0  4
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महापालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाला सिल्व्हर अवॉर्ड
पीएमसी 360, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2026,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पुणे, दि. ४ जून : डिजिटल प्रशासन आणि नागरिकाभिमुख सेवांच्या क्षेत्रात पुणे महानगरपालिकेने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागामार्फत (DARPG) प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ या महत्त्वाकांक्षी डिजिटल परिवर्तन प्रकल्पाची सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड करण्यात आली आहे.

‘ई-गव्हर्नन्स अंतर्गत जिल्हा/शहरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील उपक्रम’ या श्रेणीत हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, पुणे महानगरपालिकेच्या डिजिटल उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला. अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर राहुल जगताप यांच्या सहकार्याने डिजिटल परिवर्तनाची व्यापक मोहीम राबविण्यात आली.

‘पीएमसी ३६०’ची वैशिष्ट्ये

या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या संकेतस्थळाचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात आले आहे. विविध डिजिटल प्रणालींची पुनर्रचना, नागरिकाभिमुख ऑनलाइन सेवा पोर्टल, तक्रार व्यवस्थापन प्रणाली, व्हॉट्सअॅप आधारित सेवा तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सुविधांचा विकास करण्यात आला आहे.

नागरिकांना तक्रार नोंदविणे, माहिती मिळविणे, विविध सेवांचा लाभ घेणे आणि प्रशासनाशी थेट संवाद साधणे अधिक सुलभ झाले आहे. यामुळे पारदर्शक, जलद आणि विश्वासार्ह सेवा देण्याच्या दिशेने पुणे महानगरपालिका महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे.

राष्ट्रीय स्तरावर गौरव

‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाचे सादरीकरण नवी दिल्ली येथे तज्ज्ञ समितीसमोर करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन प्रक्रियेत या प्रकल्पाची सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड करण्यात आली.

पुण्याचा समृद्ध ऐतिहासिक वारसा जपत शहर आज डिजिटल प्रशासनातील देशातील अग्रगण्य शहरांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. ‘पीएमसी ३६०’ उपक्रमामुळे स्मार्ट गव्हर्नन्सच्या दिशेने पुणे महानगरपालिका नवा आदर्श निर्माण करत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मधील हा सन्मान पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञान भागीदार आणि पुणेकर नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याची भावना प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0