प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन; युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत युवकांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी उपलब्ध झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा ९ हजार रुपये विद्यावेतन, विमा संरक्षण आणि कौशल्य विकासाचा लाभ मिळणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

May 7, 2026 - 21:05
May 9, 2026 - 16:11
 0  15
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन; युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, पीएम इंटर्नशिप 2026

मुंबई, दि. ७ : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना देशातील युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार असून प्रतिमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.

मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत इच्छुक युवक आणि उद्योजकांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो, टाटा कॅपिटल, टायटन यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत.

या उपक्रमामुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी, व्यावसायिक नेटवर्क तयार करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मोठा फायदा होणार आहे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. या योजनेत दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, बीई, बीटेक यांसारख्या विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकांना अर्ज करता येणार आहे.

योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार भारतीय नागरिक असावा तसेच सध्या पूर्णवेळ नोकरीत नसावा.

योजनेअंतर्गत प्रतिमहा ९ हजार रुपये स्टायपेंड थेट डीबीटीद्वारे उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना एकवेळचे ६ हजार रुपयांचे विशेष अनुदान दोन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1