प्रा. दिपक देविदास घोडेकर यांना पीएच.डी. पदवी; तुलनात्मक स्त्रीवादी साहित्य संशोधनाची ऐतिहासिक नोंद
कळंब येथील इंदिरा महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे प्राध्यापक दिपक देविदास घोडेकर यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची पीएच.डी. (आचार्य) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या स्त्रीवादी साहित्यावरील तुलनात्मक संशोधनाची शैक्षणिक क्षेत्रात दखल घेतली जात आहे.
पुणे | प्रतिनिधी : रोहन सोनाळे
कळंब येथील इंदिरा महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक प्रा. दिपक देविदास घोडेकर यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची पीएच.डी. (आचार्य) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे महाविद्यालय, परिसर आणि पिंपळगाव (रुईकर) गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
प्रा. घोडेकर यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय "A Comparative Study of Female Characters in the Select Novels of Ngũgĩ wa Thiong'o, Bharati Mukherjee and Shashi Deshpande" असा असून, त्यांनी न्गुगी वा थिओंगो, भारती मुखर्जी आणि शशी देशपांडे यांच्या प्रत्येकी तीन अशा एकूण नऊ कादंबऱ्यांतील स्त्री पात्रांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे.
या संशोधनाचा मुख्य उद्देश भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या या तीन नामवंत लेखकांच्या साहित्यामधील स्त्री पात्रांचे चित्रण, त्यांचे संघर्ष, स्वातंत्र्याची आकांक्षा आणि सामाजिक परिवर्तन यांचा तुलनात्मक अभ्यास करणे हा होता. आफ्रिकन, भारतीय-अमेरिकन (डायस्पोरिक) आणि भारतीय साहित्यपरंपरा यांना एकत्र आणत स्त्रीवादी साहित्याचा व्यापक दृष्टीकोन या संशोधनातून मांडण्यात आला आहे.
या विषयावर या तिन्ही लेखकांचा एकत्रित तुलनात्मक पीएच.डी. स्तरावरील अभ्यास यापूर्वी झालेला नसल्याचे निदर्शनास आले असून, असा संशोधनप्रबंध सादर करणारे प्रा. दिपक घोडेकर हे पहिले संशोधक ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या संशोधनाची शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात विशेष दखल घेतली जात आहे.
गेल्या ११ वर्षांपासून इंदिरा महाविद्यालयात अध्यापन करणारे प्रा. घोडेकर हे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासू, संशोधक वृत्तीचे आणि लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. पिंपळगाव (रुईकर) गावातील पहिले पीएच.डी. पदवीधारक म्हणूनही त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला, इंदिरा महाविद्यालयाचे प्राचार्य, सहकारी प्राध्यापक तसेच संशोधन मार्गदर्शक प्राचार्य डॉ. नावलेकर यांना दिले आहे.
प्रा. दिपक घोडेकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
What's Your Reaction?
Like
6
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
2