पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिकेची जय्यत तयारी; आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा आणि निवाऱ्याचे सर्वंकष नियोजन

आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने पूर्वतयारीला वेग दिला आहे. अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, वाहतूक, निवारा, सुरक्षा, पोर्टेबल शौचालये, सीसीटीव्ही आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक नागरी सुविधांचे सर्वंकष नियोजन करण्यात आले.

Jun 29, 2026 - 01:23
 0  2
पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिकेची जय्यत तयारी; आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा आणि निवाऱ्याचे सर्वंकष नियोजन
पुणे पालखी सोहळा, आषाढी वारी 2026, पुणे महानगरपालिका, पालखी पूर्वतयारी, वारकरी सुविधा, प्रजीत नायर, पुणे

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

आगामी आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. पालखी मार्गावरील विविध नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (इ) प्रजीत नायर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक पार पडली.

बैठकीत पालखी मार्गावरील स्वच्छता, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्थापन, निवारा, सुरक्षा आणि आपत्कालीन सुविधा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

स्वच्छता आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पालखी मार्गावर आवश्यक ठिकाणी पोर्टेबल शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. शौचालयांच्या नियमित स्वच्छतेसाठी जेटिंग मशीन आणि अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. पालखी आगमनापूर्वी आणि प्रस्थानानंतर मार्ग व मुक्कामस्थळांची तातडीने स्वच्छता केली जाणार असून, दुर्गंधी प्रतिबंधक आणि कीटकनाशक फवारणीही केली जाणार आहे.

आरोग्य विभागाकडून पालखी कालावधीत ४० आरोग्य पथके, ३० डॉक्टर, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य शिबिरे तसेच फूट मसाज मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना मसाज सेवाही देण्यात येणार आहे.

सुरक्षा, प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही व्यवस्था

विद्युत विभागाकडून पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त प्रकाशयोजना करण्यात येणार आहे. संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख, आवश्यकतेनुसार डीजी बॅकअप, तसेच नियंत्रण कक्षातून सतत निरीक्षण केले जाणार आहे. ध्वनीप्रक्षेपण वाहनांद्वारे वारकऱ्यांना आवश्यक सूचना आणि जनजागृती संदेश दिले जाणार आहेत.

रस्ते, अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थापन

पालखी मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजविणे, रस्त्यावरील चेंबर्स समपातळीत आणणे आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे किमान पाच दिवस आधी हटविणे याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. विश्रांतवाडी अंडरपास परिसरात आवश्यक बॅरिकेडिंग तसेच शिवाजीनगर मेट्रो मार्गाखालील अडथळे दोन दिवसांत दूर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

निवारा, पाणीपुरवठा आणि पशुवैद्यकीय सेवा

भवन विभागाकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वॉटरप्रूफ मंडप उभारले जाणार असून, निवडक मैदानांवर जर्मन हॅन्गर उभारून वारकरी कार्यालय, विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, स्नानगृह, स्वच्छतागृह आणि आरोग्य शिबिरांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पाणीपुरवठा विभागाकडून पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध राहतील. पालखी मार्गावरील सुमारे १५ ठिकाणी पाणी वितरण केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पशुवैद्यकीय विभागाकडून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या बैल, घोडे आणि इतर जनावरांसाठी विशेष आरोग्य पथके नियुक्त करण्यात येणार आहेत.

सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश

या बैठकीस शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, विविध विभागांचे उपायुक्त, मुख्य अभियंते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालखी सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत पार पडावा यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिले.

पुणे महानगरपालिका वारकऱ्यांना आवश्यक सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0