सेवा वारी’ उपक्रमांतर्गत पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिका सज्ज; वारकऱ्यांसाठी सुविधा पाचपट वाढविल्या

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने ‘सेवा वारी’ उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी निवास, वैद्यकीय सेवा, पाणी, स्वच्छता, जर्मन हँगर, फिजिओथेरपी आणि इतर सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत.

Jul 9, 2026 - 06:06
 0  3
सेवा वारी’ उपक्रमांतर्गत पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिका सज्ज; वारकऱ्यांसाठी सुविधा पाचपट वाढविल्या
पुणे महानगरपालिका, सेवा वारी, पालखी सोहळा २०२६, संत ज्ञानेश्वर

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने ‘सेवा वारी’ हा विशेष उपक्रम राबवत वारकरी भाविकांच्या सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली आहे. गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी पालखी पुणे शहरात दाखल होणार असून, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि सोयी-सुविधांसाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पालखी नोडल अधिकारी निखिल मोरे आणि उपायुक्त माधव जगताप यांनी पालखीच्या अंतिम मुक्कामस्थळांची पाहणी करून सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली.

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मुक्कामस्थळी उपलब्ध जागा पाचपट वाढवून ५,००० चौरस फूट करण्यात आली आहे. महिला आणि पुरुष वारकऱ्यांसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था करण्यात आली असून, अधिक सुरक्षित आणि आरामदायी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पालखी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच विशेष जर्मन हँगर उभारण्यात आला असून, लांबचा प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांसाठी फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांकडून मोफत फिजिओथेरपी आणि मालिश सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी शहरातील विविध ठिकाणी १९५ वॉटरप्रूफ मांडव उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आवश्यक सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

निवास व्यवस्थेसाठी पुणे महानगरपालिकेच्या १०१ शाळा वारकऱ्यांसाठी खुल्या करण्यात आल्या असून, सर्व शाळांमध्ये चोवीस तास मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि औषध वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

वारीच्या काळात शहरातील पाणीपुरवठ्यात विशेष वाढ करण्यात आली असून, वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तसेच पालखी मार्गावर आणि मुक्कामस्थळी मोठ्या संख्येने मोबाईल शौचालये उभारण्यात आली असून, त्यांची स्वच्छता राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.

पुणे महानगरपालिकेने ‘सेवा हीच वारी, राम कृष्ण हरी’ या भावनेतून वारकरी भाविकांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी, नोडल अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात कार्यरत असून, पुणेकर नागरिकांनीही या सेवाकार्यात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.