राजमाता जिजाऊ पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त नाशिक येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या खेळाडूंच्या १०९ मातांचा सन्मान करण्यात आला. भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते गौरवचिन्ह, सन्मानपत्र आणि कॅलेंडर देऊन कर्तबगार मातांचा गौरव करण्यात आला.
नाशिक ब्यूरो
नाशिक, दि. १६ जानेवारी : श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती, नवी दिल्ली, रामभूमी बहूउद्देशीय मंडळ, स्व. उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि डी.एस.एफ. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा सन्मान करण्यात आला.
या गौरव सोहळ्यात एकूण १०९ कर्तृत्ववान मातांना आकर्षक चषक, सन्मानपत्र आणि कॅलेंडर देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी महानगरपालिकेचे माजी आयुक्त देविदास पवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पोखरकर, परभणीचे सुशील देशमुख, नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका सरिता सोनावणे, आई फाउंडेशनचे चेअरमन शंकर हिरे, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, राजू शिंदे आणि दीपक निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना देविदास पवार म्हणाले की, “राजमाता जिजाऊ यांनी १६०० व्या शतकात दूरदृष्टी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले आणि त्यांनी महाराष्ट्रासह देश घडवला. त्याचप्रमाणे आजच्या काळातील खेळाडूंच्या माताही आपल्या मुलांना घडवून सुदृढ समाज निर्माण करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.”
कार्यक्रमात चैताली जगोटा, श्रद्धा शेटकर, नीलांबरी केळकर, ज्योती पवार, स्वप्नाली सुळे, माधवी हेकरे, स्नेहल पाटील, प्रियांका यादव, वैशाली पाटील, रुपाली ओंबळे, सोनाली खोखले, कविता हिरे, प्राजक्ता ताजणे, अनुपमा डेर्ले, विशाखा जहागीरदार, नीलिमा बागुल, डॉ. ममता वाळेकर, स्वप्नाली पाटोळे, उज्वला फडोळ, श्रद्धा कुलकर्णी, भाग्यश्री पगारे, योगिता गायकवाड, निलोफर शेख, जयश्री कोटनाके, प्रियांका शर्मा, दीपमाला भावसार, मंजुषा भामरे, मीनाक्षी दबडे, कविता निकम, वैशाली पवार, भावना लखदीवे, ममता घरटे, हिना शेख, शर्मीन शेख, पूर्वा सुराडे, अँड. सुमित्रा ओगले-देवकाते यांच्यासह अनेक मातांचा गौरव करण्यात आला.
यावेळी गंगाधर पोखरकर यांनीही खेळाडू आणि त्यांच्या मातांच्या कार्याचे कौतुक केले. खेळाडूंच्या मातांच्या वतीने अनुपमा डेर्ले यांनी आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी केले. यादी वाचन कुणाल अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश वाघ, मनोज म्हस्के, अंकुश सिंघ, ज्योती निकम आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0