पत्रकारांना धमकी व शिवीगाळ प्रकरण : संजय दिना पाटलांची माफी मान्य नाही; गुन्हा दाखल करण्याची एस. एम. देशमुख यांची मागणी
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय दिना पाटील यांनी माफी मागितली असली तरी ती मान्य नसल्याचे एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती राज्यभर पोलिसांकडे तक्रारी दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
मुंबई : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी व्हिडिओद्वारे माफी मागितली असली तरी ती आम्हाला मान्य नसून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मांडली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर संताप व्यक्त करत पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, "तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा, माझी तक्रार करा," अशा शब्दांत आव्हानात्मक भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले.
या प्रकाराचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषद यांनी तीव्र निषेध केला. महाड, पाटण, पिंपरी-चिंचवड, नांदेडसह विविध ठिकाणी संजय दिना पाटील यांच्या विरोधात तक्रारी व निवेदने देण्यात आली. विविध वृत्तवाहिन्या आणि पत्रकार संघटनांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला.
राजकीय स्तरावरही टीका झाल्यानंतर संजय दिना पाटील यांनी व्हिडिओद्वारे माफी मागितली. मात्र, आधी पत्रकारांना धमक्या देणे, शिवीगाळ करणे आणि नंतर प्रकरण वाढल्यानंतर माफी मागणे, ही भूमिका स्वीकारार्ह नसल्याचे एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले.
"अपराध केला आहे, त्यामुळे कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे," अशी मागणी करत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने राज्यभर संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदने देऊन संजय दिना पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचेही एस. एम. देशमुख यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1