सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीसाठी विशेष पॉलिसी; ताथवडे-वाकड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय

पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीसाठी महापालिका स्वतंत्र विशेष पॉलिसी तयार करणार असून त्यामुळे नागरिकांचा आर्थिक भार कमी होणार आहे. तसेच ताथवडे-वाकड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘फ्री लेफ्ट’, रस्ते रुंदीकरण आणि अर्बन स्ट्रीट अंतर्गत फुटपाथ रुंदी कमी करण्याचे निर्देश आमदार शंकर जगताप यांनी दिले.

May 12, 2026 - 03:52
 0  3
सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीसाठी विशेष पॉलिसी; ताथवडे-वाकड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय
शंकर जगताप, झाडांची छाटणी, विशेष पॉलिसी, पिंपरी चिंचवड,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. ११ मे : पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये झाडांच्या छाटणीसाठी महापालिकेकडून स्वतंत्र विशेष पॉलिसी तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली. या निर्णयामुळे झाडांच्या छाटणीचा आर्थिक भार सोसायट्यांवरील नागरिकांवर पडणार नसल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, पर्यावरण आणि नागरी सुविधांबाबत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, शहर अभियंता मनोज सेठीया, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सध्या सार्वजनिक जागांवरील झाडांची छाटणी महापालिकेकडून केली जाते; मात्र खासगी सोसायट्यांतील झाडांसाठी कोणतीही तरतूद नसल्याने नागरिकांना स्वतः खर्च करावा लागत होता. नव्या धोरणामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी निर्माणाधीन रस्त्यांच्या कडेला प्रत्येक दोन पोलमध्ये किमान एक झाड लावणे बंधनकारक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांटमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी पीसीएमसी, पीएमसी, एमपीसीबी आणि जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले.

शहरातील सार्वजनिक शौचालयांचा सर्व्हे सुरू असून महिलांसाठी ‘शी’ शौचालयांची उभारणी CSR निधीतून करण्याबाबतही चर्चा झाली. तसेच पिंपळे सौदागर येथे पोस्ट ऑफिससाठी जागा राखीव ठेवण्याची सूचना करण्यात आली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले व ओढ्यांची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले असून अतिक्रमणे हटवण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. काळेवाडीतील दूषित पाण्याच्या समस्येवरही तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कस्पटे वस्ती रस्ता रुंदीकरण, विविध चौकांमध्ये ‘फ्री लेफ्ट’ सुरू करणे, तसेच कल्पतरू चौक, आरके चौक आणि सांगवी फाटा येथील फुटपाथची रुंदी कमी करून रस्ते रुंद करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वराज्य चौक अंडरपास आणि पीके चौक उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध करण्याच्याही सूचना प्रशासनाला करण्यात आल्या.

आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, शहराचा विकास करताना नागरिकांना दिलासा देणारे निर्णय, वाहतूक सुधारणा आणि पर्यावरण संवर्धन यांना प्राधान्य दिले जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0