स्वराज्य भवन येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न
कोल्हापूर येथील स्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे महाराष्ट्र दिनाच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस दलाच्या सलामीसह राष्ट्रगीत, राज्यगीत आणि वंदे मातरमच्या सुरांनी वातावरण देशभक्तीमय झाले.
कोल्हापूर, दि. १ मे : महाराष्ट्र दिनाच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त कोल्हापूर येथील स्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) परिसरात आज उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय गीत वंदे मातरम सादर करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी तिरंग्याला मानवंदना देत अभिमान व्यक्त केला.
या सोहळ्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, शक्ती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, रुपाली चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस दलाच्या वतीने संचलन करून ध्वजाला सलामी देण्यात आली. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसर फुलांच्या सजावटीने तसेच विद्युत रोषणाईने आकर्षकपणे सजविण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0