व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांचे मुंबईत आगमन; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
भारत दौऱ्यावर आलेले व्हिएतनाम समाजवादी प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष व महासचिव तो लम यांचे मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. मुंबई भेटीदरम्यान ते उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.
मुंबई, दि. ७ मे २०२६ : भारत दौऱ्यावर आलेले व्हिएतनाम समाजवादी प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष आणि महासचिव तो लम यांचे आज मुंबईत आगमन झाले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी आँचल गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लम हे एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर असून या भेटीदरम्यान ते महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ लोकभवन येथे विशेष स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील आर्थिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने या भेटीकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे. राष्ट्राध्यक्ष तो लम हे आज रात्री मुंबईहून पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0