उर्वरित चार दिवसांत मतदार याद्यांच्या SIR कामाला वेग द्या; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत गृहभेटी, गणना अर्ज संकलन आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया 17 ऑगस्टपर्यंत जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) अंतर्गत सुरू असलेली गृहभेट, गणना अर्ज संकलन आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीत अधिक प्रभावीपणे काम करून संपूर्ण प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईतील सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांना दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या SIR कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली.
मतदारांच्या घरी भेट देऊन गणना अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि. १७ ऑगस्ट २०२६ हा अंतिम दिवस आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित चार दिवस अत्यंत महत्त्वाचे असून, उपलब्ध मनुष्यबळ आणि यंत्रणेचा प्रभावी वापर करून प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मतदारांच्या शंकांचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले की, SIR अंतर्गत गणना अर्जाबाबत मतदारांकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे ‘बुक अ कॉल’ माध्यमातून प्राप्त होणाऱ्या शंकांचे तत्काळ निराकरण करण्यास प्राधान्य द्यावे.
तसेच, मतदारांकडून अद्याप प्राप्त न झालेले गणना अर्ज संकलित करण्यासोबतच त्यांचे डिजिटायझेशन अधिक वेगाने पूर्ण करावे, जेणेकरून विहित कालावधीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
चिन्हांकित मतदारांच्या प्रक्रियेकडे विशेष लक्ष
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनीही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. चिन्हांकित मतदारांबाबत (Marked Electors) अधिक दक्षतेने प्रक्रिया राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
चिन्हांकित मतदारांची नावे विहित प्रक्रियेनुसार प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होतील, तसेच हयात नसलेल्या मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट होणार नाहीत, याची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून खात्री करावी, असे त्यांनी सांगितले.
गणना अर्जांचे संकलन, डिजिटायझेशन आणि गृहभेटीच्या कामासाठी आता अत्यल्प कालावधी शिल्लक असल्याने, उर्वरित दिवसांत संपूर्ण प्रक्रिया वेगाने, काटेकोरपणे आणि प्रभावी समन्वयाने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या आढावा बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) श्री. सौरभ कटियार यांच्यासह मुंबईतील सर्व ERO आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
SIR प्रक्रियेतील उर्वरित कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आता विशेष लक्ष केंद्रित केले असून, मतदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांवरील कार्यवाही, गृहभेटी, अर्ज संकलन आणि डिजिटायझेशन यांना अधिक गती देण्यावर भर देण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0