जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती कार्यक्रम; डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली तंबाखूमुक्तीची शपथ

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देत व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृतीचे आवाहन केले.

May 27, 2026 - 01:12
 0  3
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती कार्यक्रम; डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली तंबाखूमुक्तीची शपथ
जागतिक तंबाखू विरोधी दिन, डॉ हर्षदीप कांबळे, तंबाखूमुक्ती, व्यसनमुक्ती,

मुंबई, दि. २६ : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कांबळे आणि समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व्यसनमुक्ती विषयक पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी डॉ. कांबळे यांनी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्त्व अधोरेखित करत तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांची माहिती दिली.

विशेषतः २० ते ३० वर्षे वयोगटातील युवकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

तंबाखूमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती, सामाजिक सहभाग आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नशाबंदी मंडळाचे चिटणीस व मुख्य संघटक अमोल स. भा. मडामे यांनी महाराष्ट्राने २०११ मध्ये व्यसनमुक्ती धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य म्हणून पुढाकार घेतल्याचे सांगितले.

व्यसनमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन करत त्यांनी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी प्रभावीपणे लागू करण्यासाठी जनजागृती आणि विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान ‘कल्याणयात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा’ या मासिकाच्या मे २०२६ अंकाचे प्रकाशन डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तंबाखूमुक्ती विषयक पोस्टर्सचेही प्रकाशन करण्यात आले.

डॉ. कांबळे आणि आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी विविध संस्थांच्या स्टॉलना भेट देऊन त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले.

पोस्टर प्रदर्शन, माहितीपर पत्रके, जनजागृती साहित्य आणि कटआऊटच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम तसेच ‘तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा २००३’ संदर्भातील माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

या कार्यक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाऊंडेशन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांसह विविध संस्थांनी सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

कार्यक्रमास नशाबंदी मंडळाचे मुंबई शहर संघटक चेतना सावंत, ठाणे जिल्हा संघटक मिलिंद पाटील तसेच मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0