अंध महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व आदर्श माता पुरस्कार 2026 उत्साहात संपन्न
ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड डिझॅबल्ड यांच्या वतीने जागतिक मातृ दिनानिमित्त अंध महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि आदर्श माता पुरस्कार 2026 वितरण सोहळा मविप्र समाज कार्य महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
नाशिक ब्यूरो
जागतिक मातृ दिनाचे औचित्य साधून ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड डिझॅबल्ड यांच्या वतीने रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी मविप्र समाजाच्या समाज कार्य महाविद्यालयातील सभागृहात अंध महिलांकरिता आरोग्य तपासणी शिबिर, विविध गुणदर्शन कार्यक्रम तसेच कर्तृत्ववान मातांचा “आदर्श माता पुरस्कार 2026” देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. स्वप्नील शिवाजी गांगुर्डे, श्री. रविंद्र शिवाजी गांगुर्डे आणि सौ. रेखा जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लुई ब्रेल व डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचा परिचय व प्रास्ताविक सादर करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आपापली मनोगते व्यक्त केली. श्री. स्वप्नील गांगुर्डे यांनी संस्थेचे कार्य पाहून आपण प्रभावित झालो असून भविष्यातही संस्थेबरोबर कायम जोडून राहणार असल्याचे सांगितले. श्री. रविंद्र गांगुर्डे यांनी संस्थेच्या मागणीनुसार महापालिकेच्या माध्यमातून शासकीय इमारत अथवा भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच गरजू अंध व्यक्तींना औद्योगिक वसाहतीत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सौ. रेखा जाधव यांनी ब्युटीशियन या नात्याने उपस्थित महिलांना सौंदर्यविषयक मार्गदर्शन केले तसेच संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून भविष्यात शक्य तेवढी मदत करण्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते सुनीता शिवदे, मंगल इंगळे, कल्पना खैरे, दीपा पारेवाल आणि पल्लवी मरकड यांना “आदर्श माता पुरस्कार 2026” देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष विकास शेजवळ यांनी संस्थेचा परिचय करून दिला तर महासचिव रामदास जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्व महिलांना आकर्षक गृहपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई बाबा हार्ट इन्स्टिट्यूटच्या डॉ. ज्ञानेश्वरी जाधव, सचिन चव्हाण, भाऊसाहेब वाळके, तुषार जाधव व त्यांच्या टीमने विशेष सहकार्य केले. तसेच सर्वश्री निशिकांत मोगल, गिरीश पवार यांनीही मोलाचे योगदान दिले. ओम साई संस्थेचे पदाधिकारी शेखर भाई शाह, निमिता शेजवळ व इतर पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0