भाभा रुग्णालयात रुग्णेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा गोंधळ; डॉक्टरांवर हल्ला, पोलिसांत तक्रार
कुर्ला येथील भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करत तोडफोड केली. घटनेनंतर आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई : कुर्ला पश्चिम येथील खान बहादुर भाभा सर्वसाधारण रुग्णालयात प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय प्रथमगर्भवती महिलेला १२ मे रोजी सकाळी १०.२५ वाजता पोटदुखीच्या तक्रारीमुळे प्रसूती विभागात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचारांनंतर रात्री १०.३० वाजता सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे तिने २.९५ किलो वजनाच्या मुलास जन्म दिला.
मात्र, १३ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता महिलेची प्रकृती अचानक खालावली. पोटदुखी वाढणे आणि पोटाचा आकार वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने ऑक्सिजन सपोर्टवर EMS विभागात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री सुमारे ९.३० वाजता तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर काही नातेवाईक आक्रमक झाले आणि त्यांनी डॉक्टर तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. दिशा जैन यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच डॉ. रुग्वेदी इंगळे, डॉ. दिव्या प्रजापती आणि डॉ. पीयूष यांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीला सामोरे जावे लागले. रुग्णालयाच्या मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेनंतर डॉक्टर आणि परिचारिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
आज रुग्णालयातील कामकाज सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावेळी हरिष भांदिर्गे यांनी डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्ण आणि डॉक्टरांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0